“पुढची निवडणूक शिवसेनेतूनच लढवणार”; शिंदे गटाच्या खासदाराने विरोधकांना ठणकावून सांगितले…
ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले तेव्हा बारामतीचे ज्योतिषी त्या काळात भरपूर फिरत होते, तसेच ते आताही फिरत असतील असा टोलाही त्यांनी पवार कुटुंबीयांना लगावला आहे.
कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून सरकारची छापून आलेल्या जाहिरातीवरून जोरदार वादंग माजलेले असतानाच आता शिवसेने-भाजपकडून युतीमध्ये कोणतेच बेबनाव नसल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही पक्षाच्या आमदार, खासदार यांच्याकडून युतीचे काम जोरदारपणे चालू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचेही सांगण्यात येत आहे. त्याचवरून आता कोल्हापूरचे ठाकरे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्याकडूनही जाहिरातीवरून चाललेल्या वादावर बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारची बाजू मांडताना हे सरकरा अभेद्य असल्याचा विश्वास दाखवून दिला.
ज्या प्रकारे माध्यमांमधून शिंदे-फडणवीस यांच्याबद्दल बातम्या छापून येत आहेत. त्या बातम्या म्हणजे दिशाभूल करणाऱ्या आहेत असंही स्पष्टपणे त्यांनी सांगितले आहे.
भाजप आणि शिंदे गट जोमात
खासदार संजय मंडलिक यांनी युतीविषयी बोलताना सांगितले की, आमच्या दोन्ही पक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. मात्र ज्या प्रकारची चर्चा सुरु आहे, ती चुकीच्या पद्धतीने सुरु असून राज्यात भाजप आणि शिंदे गट जोमाने काम करत आहे अशा शब्दात त्यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे आम्ही एकजीनसिपणाने काम करत असतानाही चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवल्या जात आहेत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
चर्चा अजून प्राथमिक पातळीवर
लोकसभेच्या निवडणुकीआधी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरु असल्या तरी उमेदवारीबाबतच्या चर्चा अजून प्राथमिक पातळीवर आहेत. तसेच जागा वाटपाबांबत व जागांच्या अदलाबदल करण्याबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया निवडणूक काळात होते असंही संजय मंडलिक यांनी बोलताना सांगितले.
बारामतीचे ज्योतिषी
यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयावरही जोरदार निशाणा साधला. ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले तेव्हा बारामतीचे ज्योतिषी त्या काळात भरपूर फिरत होते, तसेच ते आताही फिरत असतील असा टोलाही त्यांनी पवार कुटुंबीयांना लगावला आहे.
‘त्या’ सूचना वरिष्ठ पातळीवरून
संजय मंडलिक यांनी आगामी काळातील उमेदवारीबद्दल बोलताना सांगितले की, शिवसेना आणि भाजपला एकत्रित काम करण्याच्या सूचना या वरिष्ठ पातळीवरुन मिळाल्या आहेत. त्यामुळेपुढची निवडणुकही शिवसेनेमधूनच लढवणार असल्याचे त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. तसेच भाजपकडून निवडणूक लढवावी की नाही हे वरिष्ठ पातळीवरून ठरणारे आहे.