“जसजशा निवडणुका जवळ येतात तसे वातावरण बिघडत जाते”; औरंगजेबच्या मुद्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्याने चिंता व्यक्त केली
औरंगजेबचे उदात्तीकरण कोणत्याही पातळीवर होऊ शकत नाही. कारण औरंगजेब हा आपला शत्रूच आहे, त्याचे उदात्तीकरण कोणत्याही स्तरावर कुणीही होऊ शकत नाही असंही त्यांनी यावेळी म्हटले.
कोल्हापूर : मागील आठवड्यात सोशल मीडियावरील स्टेटसमुळे कोल्हापूरमध्ये दोन समाजामध्ये निर्माण झालेल्या वादामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरणाविषयी चिंता व्यक्त केला जात आहे. औरंगजेबच्या स्टेटस दोन युवकांनी आपल्या मोबाईलमध्ये ठेवल्यामुळे दोन समाजामध्ये तेड निर्माण झाली होती. सोशल मीडियावरील स्टेटसमुळे मोठा वाद निर्माण झाल्यामुळे आता सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सरकारवर टीका करताना निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सामाजिक वातावरण बिघडवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
हसन मुश्रीफ यांनी सरकारवर टीका करताना म्हणाले की, गेल्या आठवड्यापासून कोल्हापूरातील वातावरण बिघडत आहे. मात्र ज्या गोष्टीमुळे तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,
मुळात त्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात केल्या जात नव्हत्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुस्लिमांबद्दल मनात कधीच आकस ठेवला नाही. मात्र सध्या परिस्थिती वेगळी आहे.
राजकीय फायदा उठवण्यासाठी एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून त्यांच्याबद्दल समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी गंभीर टीकाही हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगताना हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात 22 वतनदार आणि सैन्याचे प्रमुख महाराजांसोबत मुस्लिम होते.
मग त्यामुळे या लोकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की, आता मावळे असलेल्या लोकांबाबत समाजात तेड निर्माण का करायची असा सवालही हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला आहे.
तसेच औरंगजेबचे उदात्तीकरण कोणत्याही पातळीवर होऊ शकत नाही. कारण औरंगजेब हा आपला शत्रूच आहे, त्याचे उदात्तीकरण कोणत्याही स्तरावर कुणीही होऊ शकत नाही असंही त्यांनी यावेळी म्हटले.
तसेच हसन मुश्रीफ यांनी मुस्लिम बांधवांनाली सल्ला देताना सांगितले की, कुटुंबीयांनीही आपल्या मुलांना समजवून सांगणे गरजेचे आहे. तसेच कोल्हापूरमधील दंगल हे कोल्हापूर पोलिसांचे इंटेलिजन्स फेल्युअर आहे.
कालसुद्धा पोलिसांनी कागलमधील संबंधित मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. काही दिवसांनी आता राज्यातील निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, तस तसे वातावरण बिघडत जाते आहे. त्यामुळे शांतता राखा असं आवाहनही त्यांनी केले आहे.