Chandrapur Leopard | चंद्रपुरातील शक्तीनगर भागातून बिबट्या जेरबंद, मानवी मृत्यूस कारणीभूत बिबट्या हाच का?
दोन मुलांना नुकतेच बिबट्याने उचलून ठार केले होते. त्यामुळं या बिबट्याला अटक करण्यासाठी वनविभागानं पुढाकार घेतला. पिंजरे लावले. या पिंजऱ्यात तो अडकला.
चंद्रपूर : शहरालगत वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडची कोळसा कामगार वसाहत शक्तीनगर भागात आहे. शक्ती नगर भागातून आज सकाळी एक बिबट्या जेरबंद करण्यात आला. शक्तीनगर- दुर्गापूर- ऊर्जानगर या भागातून बिबट हल्ल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने (Forest Department) पिंजरे लावले होते. काही दिवसांपूर्वी दोन मुलांना उचलून नेत मृत्यूच्या घटना झाल्या होत्या. वनविभागाने शक्तीनगर परिसरात चार ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला पिंजराबंद करण्याचे प्रयत्न चालविले होते. आज पहाटे यातील एका पिंजऱ्यात बिबट जेरबंद झाला. मानवी मृत्यूस कारणीभूत असलेला हाच बिबट्या असल्याचा वनाधिकाऱ्यांचा कयास आहे. या परिसरात आणखी काही दिवस आणखी सावधानता बाळगण्याचे आवाहन उपविभागीय वनाधिकारी (Forest Officer) राहुल खाडे (Rahul Khade) यांनी केले आहे.
सावधगिरी बाळगणे गरजेचे
चंद्रपुरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळं मानवी जीवन धोक्यात येते. दोन मुलांना नुकतेच बिबट्याने उचलून ठार केले होते. त्यामुळं या बिबट्याला अटक करण्यासाठी वनविभागानं पुढाकार घेतला. पिंजरे लावले. या पिंजऱ्यात तो अडकला. एक बिबट्या अडकला म्हणून आनंद साजरा करू नका. अन्य वन्यप्राणी जंगलात आहेत. त्यामुळं सावधगिरी बाळगणे एवढेच आपल्या हातात असल्याचं वनाधिकारी म्हणाले.
विहिरीतील बिबट्याला सुखरुप काढले
काल बुलडाणा जिल्ह्यात एक बिबट्या विहिरीत पडला होता. त्याला विहिरीत पिंजरा टाकून सुखरुप बाहेर काढण्यात आले. लोकांनी बिबट्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. या बिबट्याने काही जनावरे या भागात फस्त केली होती. त्यामुळं त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. जंगलात पाण्याची कमतरत जाणवत आहे. उन्हामुळं तहान लागते. त्यामुळं वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर येतात. त्यामुळं ते मानवी वस्तीतही शिरतात.