Balasaheb Thorat : नेत्यांनो, पद सोडायला सांगायची वेळ येऊ देऊ नका; बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेस नेत्यांना आवाहन
Balasaheb Thorat : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दोन दिवसाचे नवसंकल्प शिबीर नुकतेच उदयपूर येथे पार पडले. या शिबिरातील घोषणापत्राची अंमलबजावणी राज्यात केली जाणार आहे.
शिर्डी: काँग्रेसचे (congress) नवसंकल्प चिंतन शिबीर उदयपूरला झाले होते. या शिबीरात अनेक ठराव पास झाले. अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि निर्णय घेतले गेले. या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आमचं शिबीर ठेवण्यात आलं आहे. उदयपूरच्या शिबीरात एक व्यक्ती, एक पद ही संकल्पना मांडली गेली. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. परंतु अजूनही काही नेत्यांनी दोन पदे असताना एक पद सोडलेले नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे दोन पदे आहेत. त्यांनी एक पद स्वत:हून सोडलं पाहिजे. पद सोडा असं नेत्यांना सांगण्याची वेळ येऊ नये. दोन पद असलेल्यांनी एक पद आपणहून सोडावं, असं आवाहन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी केले. ते मीडियाशी संवाद साधत होते. आता थोरातांनीच आवाहन केल्याने काँग्रेस नेते त्याला कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यापूर्वी नसीम खान (naseem khan) यांनी निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा स्वत:हून राजीनामा दिला होता.
निवडणूकांची तयारी ही सतत करावी लागत आसते. फक्त निवडणूक आल्या की तयारी करता येत नसते. काँग्रेसचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे शिबीर आयोजित केलं आहे, असं सांगतानाच आम्ही तिन्ही पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र आलो आहोत. त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
रोड मॅप तयार करणार
काँग्रेसच्या दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा शिबीराची शिर्डीत सुरुवात होत आहे. आज आणि उद्या हे शिबीर चालेल. या कार्यशाळेत उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या घोषणापत्राची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील रोडमॅप तयार केला जाणार असल्याची माहिती, बाळासाहेब थोरात यांनी दिली. या कार्यशाळेला पक्ष प्रभारी एच. के. पाटील. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मंत्रीमंडळातील सर्व मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पक्ष पदाधिकारी उपस्थित असतील, असे त्यांनी सांगितलं.
सहा गटांची निर्मिती
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दोन दिवसाचे नवसंकल्प शिबीर नुकतेच उदयपूर येथे पार पडले. या शिबिरातील घोषणापत्राची अंमलबजावणी राज्यात केली जाणार आहे. यासाठी राजकीय, संघटन, आर्थिक, शेती, शेतकरी आणि सहकार, सामाजिक न्याय आणि युवा व महिला सक्षमीकरण या विषयावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी सहा गट स्थापन करण्यात आले आहेत. हे सहा गट घोषणापत्राच्या अमंलबजावणीसंदर्भात रोडमॅप तयार करतील. त्यावर समूह चर्चा होईल तर दुसऱ्या दिवशी या सहा गटांच्या अहवालांचे सादरीकण केले जाईल. उदयपूरच्या नवसंकल्प शिबिरातील सर्व मुद्दे राज्यातील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.