VIDEO | राम कृष्ण हरि! ताजोद्दिनबाबांनी भर किर्तनात देह ठेवला, ‘त्या’ व्हिडीओनं महाराष्ट्रावर शोककळा, ह्रदयविकाराचा झटका
सोमवार 27 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता ते ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन करत होते. अचानक छातीत दुखू लागल्यामुळे ते व्यासपीठावरच खाली बसले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्यांनी व्यासपीठावर देह ठेवला.
धुळे : प्रख्यात कीर्तनकार हभप ताजोद्दीन शेख महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जामदे गावी कीर्तन सुरु असतानाच त्यांनी देह ठेवला. गावातील राम मंदिरामध्ये सुरु असलेल्या सप्ताहा दरम्यान कीर्तन करत असताना महाराजांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांनी कीर्तनातच प्राण सोडला.
व्यासपीठावरच खाली बसले
मुस्लिम धर्मीय असून देखील हभप ताजोद्दीन शेख महाराज हिंदू देवी-देवतांचे कीर्तन करत असत. वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून त्यांची ओळख होती. सोमवार 27 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता ते ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन करत होते. अचानक छातीत दुखू लागल्यामुळे ते व्यासपीठावरच खाली बसले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्यांनी व्यासपीठावर देह ठेवला.
भाविकांनी त्यांना तात्काळ शनिमांडळ येथील रुग्णालयात नेले, त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नंदुरबारमधील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ताजोद्दीन महाराज यांचं कार्य खूप मोठं होतं. धार्मिक कट्टर पंथियांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी वारकरी संप्रदायाचे कार्य अत्यंत निष्ठेने केल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दोन वर्षांपूर्वीचे उद्गार खरे ठरले
विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी साक्री तालुक्यातील प्रतापूर येथे सप्ताहानिमित्त हभप ताजोद्दीन महाराज शेख यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. “मला कीर्तन करताना मरण आले, तर माझ्या सारखा भाग्यवान मीच असेन” असे उद्गार त्यांनी काढले होते.
हिंदू धर्माबरोबरच मुस्लीम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन धर्मातील महत्वाच्या गोष्टींवर महाराज भाष्य करत असत. मी मुस्लीम धर्मात जन्माला आलो असलो, तरी हिंदू धर्मातच मरणार, असे ते नेहमीच कीर्तनातून सांगत असत. मला हे दोन्ही धर्म प्रिय आहेत. जन्माला आलो म्हणून मुस्लीम तर संत साहित्याच्या स्पर्शामुळे हिंदू धर्म मला फार प्रिय आहे आणि त्या धर्मातच मी मरणार आहे, असेही ते म्हणत.
औरंगाबादेत सांप्रदायिक कार्याची सुरुवात
ताजोद्दीन महाराजांनी आपल्या सांप्रदायिक कार्याची सुरुवात औरंगाबाद शहरातून केली होती. कीर्तन, भारूडे, गवळणी आणि रामायण कथा याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. संत साहित्याबरोबरच, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सावरकर यांच्यासंदर्भातही ते आपल्या कीर्तनातून भाष्य करत. मराठी वाड्मय आणि संत साहित्यावर त्यांनी पीएचडी केल्याची माहिती आहे.
पाहा व्हिडीओ :
हभप ताजोद्दीन शेख महाराज यांनी देह ठेवला, धुळ्यात कीर्तन सुरु असताना व्यासपीठावर कोसळल्यानंतर अखेरचा श्वास #TajoddinMaharaj | #Dhule pic.twitter.com/R3UGrNe51s
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 28, 2021
संबंधित बातम्या :
महंत नरेंद्र गिरी यांच्या खोलीत 7 पानी सुसाईड नोट! शिष्य आनंद गिरीचं नाव