VIDEO | भररस्त्यात मर्सिडीज पेटली, गोंदियातील आगीत कार जळून खाक
गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गापासून जवळपास 8 किलोमीटर अंतरावर घाटाजवळ मर्सिडीज कंपनीची चारचाकी कार जळून खाक झाली. ही आग नेमकी कशी लागली, याविषयी माहिती मिळालेली नाही.
गोंदिया : भर रस्त्यात मर्सिडीज कंपनीची कार (Mercedes) जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाजवळ ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नेमकं काय घडलं?
गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गापासून जवळपास 8 किलोमीटर अंतरावर घाटाजवळ मर्सिडीज कंपनीची चारचाकी कार जळून खाक झाली. ही आग नेमकी कशी लागली, याविषयी माहिती मिळालेली नाही. मात्र भर रस्त्यात मर्सिडीज कार जळून राख झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
आगीत जीवितहानी नाही
सुदैवाने या कारमधील चालक आणि प्रवासी वेळीच बाहेर पडल्यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाडीचा जळून कोळसा झाल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. गाडीने पेट घेतल्यानंतर देवरी येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून व्हिडीओ समोर आला आहे.
पाहा व्हिडीओ :
मुंबईतील आगीत मर्सिडीज कार जळून खाक
मुंबईतील महालक्ष्मी रेल्वेस्थानकाजवळील पुलाखालील दोन सर्व्हिस सेंटरना जवळपास अडीच वर्षांपूर्वी भीषण आग लागली. रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. यामध्ये सर्व्हिस सेंटरमधील 6 मर्सिडीज कार जळून खाक झाल्या होत्या अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नव्हती, मात्र सर्व्हिस सेंटरमधील तब्बल सहा मर्सिडीज गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या होत्या. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं नसतं, तर शेजारीच असणाऱ्या महालक्ष्मी रेल्वे स्थानकाला ही आग लागण्याची भीती वर्तवण्यात आली होती. महालक्ष्मी रेल्वेस्थानकाच्या अगदी जवळच ही आगीची दुर्घटना घडल्याने रेल्वे स्थानक परिसरातील ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.
पालघरमध्ये कंटेनर पेटून आलिशान गाड्यांची राख
दुसरीकडे, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार घेऊन जाणाऱ्या कंटेनरला काही महिन्यांपूर्वी भीषण आग लागली होती. यामध्ये कंटेनरमधील सर्व महागड्या गाड्या जळून खाक झाल्या होत्या. मनोर येथील चिल्लार फाट्याजवळ हा प्रकार घडला होता. मुंबईहून दिल्लीला कंटेनरने कार नेल्या जात असताना अचानक आग लागली होती. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर भागात कंटेनर चालकाला कंटेनरमधून धूर निघत असल्याचं लक्षात आलं. त्याने तत्परता दाखवत कंटेनर चिल्लार फाट्याजवळ सर्व्हिस रोडवर थांबवला. कंटेनर बाजूला उभा करुन पाहिलं असता कंटेनरमधील आलिशान गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं दिसलं होतं.
संबंधित बातम्या :
मुंबईत भीषण आग, 6 मर्सिडीज जळून खाक
VIDEO | पालघरजवळ कंटेनर पेटला, कोट्यवधींच्या तीन आलिशान कार जळून खाक