Maharashtra Rains IMD Updates : रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात दरड कोसळली, रस्त्याला भेगा; प्रवासासाठी पर्यायी मार्ग सूचवला
Maharashtra Rains IMD Monsoon Updates : गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने पोलादपूरच्या आंबेनळी घाटात एकदा नव्हे तर दोनदा दरड कोसळली आहे.
पोलादपूर : कोकणात पावसाने धुमशान घातलं आहे. गेल्या चार दिवसांपासून कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीही साचलं आहे. काल रात्री रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील आंबेनळी घाटात मोठी दरड कोसळली आहे. त्यामुळे रस्त्याला भेगाही पडल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली आहे. मात्र, आंबेनळी घाटात दरड कोसळल्यानंतर अखेर हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलादपूर येथील आंबेनळी घाटात कालिकामाता पॉइंटजवळ ही दरड कोसळली आहे. काल रात्री 11 वाजता आणि सकाळी 7 वाजता अशी दोन वेळा दरड कोसळली आहे. याच मार्गाने महाबळेश्वरकडे जाता येते. दरड कोसळल्यानंतर येथील रस्त्याला भेगाही पडल्या आहेत. त्यामुळे आंबेनळी घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ताम्हणी घाटातून पर्यायी वाहतूक वळवण्यात आली आहे. या पर्यायी मार्गाचा किंवा इतर मार्गाचा प्रवाशांनी वापर करावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
दरडी कोसळणे सुरूच
महाबळेश्वरसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. घाट रस्त्यात दरडी कोसळत आहेत. काल रात्री आंबेनळी घाटात दरड कोसळली. त्यामुळे पोलादपूरकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा रस्ता बंद करण्यात आला आहे. कठडाही दरडीमुळे कोसळला आहे. जेसीबीच्या मदतीने रस्ता मार्ग मोकळा केला जात आहे. रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे, असं सांगण्यात आलं.
तहसीलदारांचं आवाहन
प्रवाशांनी माणगावकडून पुण्याकडे जाणाऱ्या ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा. आंबेनळी घाटाचा प्रवास टाळा. दुसऱ्या मार्गाचा प्रवास करा. जीव धोक्यात घालू नका. आम्ही वाहने अडवत आहोत. रस्ता बंद केला आहे. पर्यायी मार्ग अनेक आहेत. गरज नसेल, अत्यंत तातडीचे असेल तरच या. पण शक्यतो आंबेनळी घाटातून प्रवास टाळा, असं आवाहन पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी केलं आहे.
रायगडमध्ये अति जोरदार पावसाचा इशारा
दरम्यान, येत्या काही दिवसात रायगडमध्ये अति जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. मुसळधार पाऊस झाल्यास रायगड जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची समस्याही सुटणार आहे.