अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात दिलेला आपला शब्द पूर्ण केलाय. बिनविरोध निवडणुकींसाठी गावांना प्रोत्साहन म्हणून जाहीर केलेला 25 लाख रुपयांचा निधी निलेश लंके यांनी दिलाय. तसेच मी वाचाळवीर नाही, तर शब्दाचा पक्का आहे, असं मत व्यक्त केलं (MLA Nilesh Lanke complete his words during Gram Panchayat Election about fund).
निलेश लंके म्हणाले, “मी दिलेला शब्द पाळणारा आहे. केवळ वाचाळवीर नाही. ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करा, तुमच्या गावाला 25 लाखांचा निधी देतो, असं आवाहन मी केलं होतं. काही गावांनी प्रतिसादही दिला. मात्र, काही गावात राजकीय हेतूने खोडा घातला गेला. ज्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या त्यांना मी निधी देऊन वचनपूर्ती केलीय.”
पारनेर तालुक्यात मागील वर्षी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. ग्रामपंचायत बिनविरोध केल्या तर गावाच्या विकास कामांसाठी 25 लाख रुपये देण्यात येतील, असं आश्वासन आमदार लंके यांनी दिलं होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी संबंधित गावांना सभामंडप, रस्ते ,सांस्कृतिक भवन, सुशोभीकरण आदी कामांसाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. ही “बक्षिसी” मिळाल्याने गावकरीही चांगलेच आनंदी आहेत.
आमदार लंकेंच्या बिनविरोध निवडणुकीच्या आवाहनाला कोणत्या गावांचा प्रतिसाद?
आमदार निलेश लंके यांच्या बिनविरोध निवडणुकीच्या आवाहनाला प्रतिसाद देत हंगे, शिरापूर, रांधे, कारेगाव, वेसदरे, पिंप्री पठार, जाधववाडी, भोयरे गांगर्डा व पळसपूर यासह नगर तालुक्यातील अकोळनेर ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. अनेक गावांमध्ये केवळ विरोधकांनी खोडा घातल्याने एका जागेसाठी निवडणूक झाली.
कोणत्या कामासाठी किती निधी?
बिनविरोध निवडणुका झालेल्या गावांना 25 लाखाचा निधी विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आला. पाबळ तळेवाडी ते पांढरकरवस्ती रस्ता (15 लाख), जवळा ते गाडीलगाव रस्ता (25 लाख ) पळसपूर येथे स्मशानभूमी सुशोभीकरण (25 लाख), शिरापूर येथे उचाळे वस्ती शिरापूर रस्ता ( 25 लाख ), हंगे येथे सामाजिक सभागृह (50 लाख), भोयरे गांगर्डा येथे गजाबाई मुक्ताबाई मंदीर सुशोभिकरण (25 लाख), कारेगाव चारंगेश्वर मंदीर सभागृह (15 लाख) व मुक्ताबाई मंदीर सुशोभिकरण (10 लाख), पिंप्रीपठार भैरवनाथ मंदीर सभामंडप (25 लाख), वेसदरे सांस्कृतिक भवन (25 लाख), जाधववाडी स्मशानभूमी व प्रवेशद्वार (25 लाख), रांधे सभामंडप व मज्जीद सुशोभिकरण (25 लाख ), देसवडे येथे टेकडवाडी ते काळेवाडी घाट (25 लाख), राळेगणथेरपाळ येथे डोमेवस्ती ते खंडोबावस्ती रस्ता (15 लाख ), कडूस येथे वाघाजाई मंदीर सभामंडप (5 लाख ) नांदूरपठार येथे श्रीकृष्ण मंदीर सुशोभिकरण (5 लाख), बाबुर्डी बेंद (ता. नगर गावठाण ते शिवरस्ता (25 लाख), पिंप्रीघुमट ते हंडेवस्ती रस्ता (20 लाख), आकोळनेर गावांतर्गत काँक्रीटीकरण (10 लाख), देउळगांव सिद्धी सांस्कृतिक सभागृह (50 लाख), बाबुर्डी घुमट रस्ता (20 लाख), हिंगणगांव कुरणमळा रस्ता (25 लाख).
पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील ज्या मुलभुत गरजा आहेत त्या अगोदर पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असेल, असंही आश्वासन यावेळी निलेश लंके यांनी दिलंय.
हेही वाचा :
‘कार्यकर्ते गादीवर, आमदार जमिनीवर’, साधेपणानं राहणारा अहमदनगरचा आमदार कोण?
नगरची व्हीआरडीई चेन्नईला हलविण्याच्या हालचाली, आमदार निलेश लंकेंनी घेतली पवारांची भेट
व्हिडीओ पाहा :
MLA Nilesh Lanke complete his words during Gram Panchayat Election about fund