कोल्हापूर : मला हक्कभंगाची कोणतीही नोटीस आलेली नाही. मी विधिमंडळाचा अपमान होईल, आमदारांचा अपमान होईल असं काही विधान केलं नाही. जे लोक आमच्यातून फुटून गेले अशा एका विशिष्ट गटाला मी चोरमंडळ म्हटलंय. त्याने पक्षाची चोरी करणं, धनुष्याची चोरी करणं योग्य नाही. ते विधान मी बाहेर केलं आहे. त्यामुळे हक्कभंग होतं की नाही पाहावं लागेल. माझी बाजू समर्थपणे मांडेल. सर्वच त्यांना चोर म्हणत आहेत. बच्चू कडू यांना तर लोकांनी अडवून चोर म्हटलं, असं सांगतानाच मला फासावर लटकवायचं तर लटकवा. तेवढंच बाकी आहे. तुरुंगात टाकून झालं. आता फासावर लटकवा, असा संताप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते कोल्हापुरात मीडियासी संवाद साधत होते.
शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील बैठकीत माझ्या विधानावर नाराजी व्यक्त केली नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. संविधान, घटना, नियम याबाबत ते जागृत असतात. पण आम्ही एक आहोत. पवारांनी जी भूमिका मांडली ती महत्त्वाची आहे. जी हक्कभंग समिती आहे ती पक्षपाती आहे, असं ते म्हणाले. या समितीत मूळ शिवसेनेचा एकही व्यक्ती नाही. ज्यांनी तक्रार केल्या त्यांनाच न्यायाधीश करण्यात आलं आहे. हे चुकीचं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
कसब्याचा निकाल आल्यापासून त्यांना घाम फुटला आहे. त्यांची थोडीफार झोप शिल्लक होती तीही उडाली आहे. कसब्यात पराभव झाला. पण चिंचवडमध्येही त्यांचा विजय झाला मानायला हे तयार नाहीत. मागच्यावेळी कसब्यात राष्ट्रवादीला 44 हजार मते मिळाली होती. आता लाखावर मते मिळाली. आमच्यातील बंडखोर उभा केल्याने त्यांना यश मिळालं, असं त्यांनी सांगितलं.
पुन्हा एकदा आहे त्यापेक्षा शिवसेना जास्त जागा जिंकेल असं वातावरण मी कोल्हापुरात पाहिलं. आम्ही विरोधाककडे पाहतच नाही. विरोधक नाहीच आहे. काही लोक रस्त्यावर उड्या मारत असतात आमच्या विरोधात. काही वर्षाने तेही नष्ट होतील, असा टोला त्यांनी लगावला. तर शिंदे गटाच्या शिवधनुष्य यात्रेवरही त्यांनी टीका केली. धनुष्य नीट उचला. रावणानेही धनुष्य उचलंल होतं. त्याचं काय झालं ते रामायणातून समजून घ्या. अशी सोंगंढोंग महाराष्ट्रात चालत नाही. महाराष्ट्रात सचोटी चालते. त्यांच्या यात्रा म्हणजे पैश्यांचा खेळ असतो, असंही ते म्हणाले.