नांदेड : बहुतेक युवकांचा शेतकडं पाहण्याचा दृष्टिकोण नकारात्मक आहे. पण, काही तरुण अजूनही शेतीतून चांगले उत्पन्न घेतात. धडधाकट तरुण शेतीकडं पाठ फिरवतात. पण, दोन्ही पाय नसताना एका युवकानं मोठा निर्णय घेतला. काहीही झालं तरी भीक मागायची नाही. पाय नसले म्हणून काय झालं. जे जमेल ते काम करायचं. घरी शेती होती. त्या शेतीत पाणी नव्हतं. तरीही त्याने हार मानली नाही. तीन एकर शेतीतून त्यानं समाजासमोर एक आदर्श घालून दिला.
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चोरंबा इथल्या दोन्ही पायांनी अपंग असलेल्या चंद्रकांत नरोटे या युवकाने जिद्दीने शेती फुलवलीय. चंद्रकांत शेतीतील सगळी कामे स्वतः करत असून अवघ्या तीन एकर क्षेत्रात तो लाखोंचे उत्पन्न मिळवतोय. स्वतःच्या मेहनतीच्या बळावर या अपंग युवकाने दोन बहिणीचे विवाह लावून दिलेत.
आता तिसऱ्या बहिणीच्या लग्नाची तो तयारी करतोय. सरकारकडून मिळालेल्या तीनचाकी वाहनांचा वापर करत सकाळच्या सत्रात तो दूध विक्रीचा देखील व्यवसाय करतो. धडधाकट असलेल्या तरुणाने आदर्श घ्यावा, अशी या अपंग युवकाची प्रेरणादायी कहाणी आहे.
चंद्रकांत नरोटे म्हणतो, बारावीपर्यंत शिक्षण झालं. शेतातील जमिनीत पाणी नव्हतं. तरीही शेती करायची ठरवली. भीक नाही मागायची, हे मनात ठासलं. २०१२ पासून शेती करतो. त्यातून गरजेपुरते पैसे मिळतात.
चंद्रकांतकडे तीन एकर शेतजमीन. या जमिनीच्या भरोशावर दोन बहिणींचे लग्न केलं. एक प्लाट खरेदी करून घर बांधलं. मी दोन्ही पायांनी अपंग असून एवढं केलं. पायवाल्यांनी हार मानायची नाही, असा संदेश चंद्रकांत नरोटे देतो.
चंद्रकांत नरोटे तीनचाकी गाडीने शेतात जातो. गवत कापतो. म्हशीला चारा टाकतो. दूध काढतो आणि दुधविक्रीचा व्यवसायही करतो. हे सारं दोन पाय नसलेल्या युवकाला जमतं. मग, पाय असलेल्यांना का करू नये, असा प्रश्न चंद्रकांत नरोटे याला पडतो.