15 दिवसांपूर्वी गेलेली वीज अजून आलेली नाही! सरकार ‘या’ गावातील लोकांनी जगायचं कसं?
एकीकडे विकासकामांचा शुभारंभ, दुसरीकडे गावातील मूलभूत समस्यांचा प्रश्न जैसे थे! 15 दिवसांपासून कोणत्या गावचा वीज पुरवठा खंडीत? वाचा सविस्तर
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कुंचेली गावात विद्युत रोहित्र (डिपी) जळालं. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. आता 15 दिवसानंतरही गावातील वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. विद्युत पुरवठ्याअभावी गावातील लोकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला असून वीज नसल्यानं गावातील लोकांचा खोळंबा झालाय.
दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोकांना शेजारच्या गावात जावं लागतंय. तर पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागतेय. गेल्या पंधरा दिवसांपासून गावातील लोकांनी विद्युत पुरवठा पूर्वपदावर येण्यासाठी मागणी केली आहे. पण ग्रामस्थांच्या मागणीला कुणीही गांभीर्याने घेतल्याचं दिसून आलेलं नाही.
पंधरा दिवसांपासून गावातील लोक विद्युत रोहित्राची मागणी करत आहेत. पण त्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्यानं गावातील लोक हवालदिल झाले आहेत. आता तर गावातील लोकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय.
शहरात वीज पंधरा मिनिटांसाठी जरी गेली, तरी श्वास थांबल्यासारखी लोकांची अवस्था होते. नांदेडच्या कुंचेली गावात तर तब्बल 15 दिवसांपासून वीज नसल्यामुळे लोकांना किती अडचणींना सामना करावा लागत असेल, याची निव्वळ कल्पना केलेली बरी!
प्यायला पाणी नाही, जेवायला काही नाही, शासनाने आमच्या मागणीची गंभीर दखल घ्यावी, नाहीतर आम्ही उपोषणाला बसू, असा इशारा एका ग्रामस्थाने टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिला. सर्व डिपी जळालेत, दळण बंद आहे. पाण्याचे मोटर बंद झाले आहेत, महावितरणने आम्हाला डिपी देऊन विद्युप पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
एकीकडे मोठमोठ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ होत असताना ग्रामीण भागातील लोकांना साध्या विजेसाठी संघर्ष करावा लागत असल्याचं पाहायला मिळालंय. आता या गावातील लोकांची हाक प्रशासनाकडून ऐकली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.