पार्सल देण्यासाठी गेला, मार खाऊन आला; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?
ही घटना रंगपंचमीच्या दिवशीची आहे. कामावर होतो. तीन वाजतानंतर बजरंगनगर येथे आर्डर देण्यासाठी गेलो होतो. बिलिंग करत असताना चार लोकं तिथं आले.

नांदेड : शहरातील बजरंगनगर येथे झोमटो कंपनीच्या डिलिव्हरीबॉयला मारहाण करण्यात आली. होळीच्या दिवशी ही घटना घडली. आज या मारहाणीचा सीसीटीव्हीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला. अमरान तांबोळी असं या युवकाच नाव आहे. तो होळीच्या दिवशी बजरंगनगर येथे पार्सल देण्यासाठी गेला होता. पार्सल देऊन तो पैसे घेण्यासाठी थांबला असता चार युवक आले. त्यांनी अमरानला मारहाण करण्यास सुरूवात केली. लाथा बुक्यांनी मारून त्याला काठीने देखील मारण्यात आले. नंतर या युवकांनी दगडफेक केली. यात अमरान जखमी झाला. त्याच दिवशी सायंकाळी त्याने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली. व्हिडियो व्हायरल झाल्यावर पाच दिवसांनी विमानतळ पोलिसानी गुन्हा दाखल केला. एकाला अटक केली असून तिघांचा शोध सुरू आहे.
पोलीस म्हणतात,…
यासंदर्भात पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे म्हणाले, सात मार्च रोजी ही घटना घडली. झोमाटाचा एक कर्मचारी अमरान बजरंगनगरमध्ये आर्डर देण्यासाठी गेला होता. होळी असल्याने तीन-चार अज्ञात व्यक्तींनी त्याला मारहाण केली. अमरानती तक्रार दाखल करण्यात आली. आज एका आरोपीला अटक केली. सर्व आरोपींची नाव माहीत झाली आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.
पीडिताने सांगितली आपबिती
पीडित युवक अमरान तांबोळी म्हणाला, ही घटना रंगपंचमीच्या दिवशीची आहे. कामावर होतो. तीन वाजतानंतर बजरंगनगर येथे आर्डर देण्यासाठी गेलो होतो. बिलिंग करत असताना चार लोकं तिथं आले. टीशर्ट काढ म्हणून मला मारहाण करण्यात आली. स्वतःचा बचाव करताना गाडी पडली. मी पळत असताना माझ्यावर दगडफेक करण्यात आली. ज्यांच्या घरी डिलिव्हरी दिली त्यांनी मला मदत केली. झोमाटोची टीम आली. रुग्णालयात घेऊन गेली. त्यानंतर मी शुद्धीवर नव्हतो. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर विमानतळ पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रकृती बरी नसल्याने तीन दिवसांपासून घराबाहेर पडलो नाही. अशी आपबिती अमराननं सांगितली.