लेडी गवंडी ! नाजूक हात तोलतात सतत 10 किलो वजन आणि भिंतीला फटकारे मारण्याची धमक, सॅल्यूट
सीमा गायकवाड या करत असलेल्या बांधकामचं काम सोपं नाही. हातात 10 किलोचं वाळूचं घमेलं पकडून भिंतीवर फटकारा मारणं फार कठीण आहे. तसेच या कामामुळे हाता-पायांना त्वचेचे वेगवेगळ्या प्रकारचे विकार होण्याची देखील भीती असते. पण त्यांनी हे काम करण्यामागे देखील एक महत्त्वाचं कारण सांगितलं आहे.
नांदेड : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक महिला असते. प्रत्येक यशस्वी कुटु़ंबामागेही एक महिला महत्त्वाची भूमिका निभावते. एक महिला तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर काय करू शकते, याचा कधीच अंदाज बांधला जाऊ शकत नाही. आज दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मुलांपेक्षी मुलीच जास्त गुणांनी बाजी मारताना दिसतात. खरंतर इथे तुलना करण्याचा विषय नाही. पण मुली, महिला अतिशय कमी साधनसामग्री आणि कठीण परिस्थितीवर मात करून पुढे येत आहेत हीच मुळात जमेची बाजू आहे. आपलं घर-दार, मुलं सांभाळून नोकरी करणाऱ्या महिलांचं समाजाला विशेष अप्रूप वाटायला हवं. कारण त्यांच्यासारखी चोख जबाबदारी पार पाडणं भल्याभल्यांनाही जमत नाही.
खरंतर या महाराष्ट्राच्या मातीत अशा अनेक शूर महिलांचा जन्म झालाय. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ, त्यांच्या नातसून राणी येसूबाई, ताराराणी यांचं आदराने नाव घेतलं जातं. याशिवाय झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ अशा भरपूर महिला आहेत. पण खरंतर प्रत्येक घरातली महिला ही शूर आहे. ती कुटुंबासाठी जे काही करते त्यामुळे संबंधित कुटुंब समृद्ध होण्यास मदत होते.
याशिवाय काही महिला तर कुटुंब सांभाळत समाजकारण आणि राजकारणात उल्लेखनीय कामगिरी करतात. तर काही महिलांच्या कुटुंबाचा गरिबीमुळे जगण्यासाठी संघर्ष असतो. अशावेळी कुटुंबासाठी महिलाच कर्ताधर्ता होते. ती पुरूषांच्या खांद्याला खांद्या लावून काम करते. म्हणून तिचं सर्वत्र कौतुक होतं. आम्ही नांदेडच्या अशाच एका महिलेविषयी माहिती तुम्हाला देणार आहोत.
बांधकामावर महिलांना आजवर केवळ मजुरी करताना आपण महिलांना पाहिलंय, मात्र त्यातून अवघी शंभर ते दोनशे रुपये मजुरी महिलांना मिळते. त्यातून कुटुंबाची गुजराण होत नसल्याने नांदेडमध्ये सीमा गायकवाड नावाच्या महिलेने गवंडी काम शिकून घेतलंय. पुरूषांच्या बरोबरीने सीमा बांधकाम आणि गिलावा करण्याचं गवंडी काम करतेय. त्यातून तिला आता दिवसाला सातशे रुपयांची मजुरी मिळत असल्याने सीमाने समाधान व्यक्त केलंय.
10 किलोचं सिमेटचं घमेलं पकडून भिंतीवर फटकारा
सीमा गायकवाड या करत असलेल्या बांधकामचं काम सोपं नाही. हातात 10 किलोचं वाळूचं घमेलं पकडून भिंतीवर फटकारा मारणं फार कठीण आहे. तसेच या कामामुळे हाता-पायांना त्वचेचे वेगवेगळ्या प्रकारचे विकार होण्याची देखील भीती असते. त्यात सीमा या महिला आहेत. त्यामुळे सीमा यांचं हे काम अतिशय धाडसी आहे.
खरंतर सीमा या बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो महिलांचं एक प्रातिनिधिक उदाहारण आहेत. सीमा यांच्या सारख्या शेकडो महिलांना गरिबीमुळे अशाप्रकारचं काम करावं लागतं. या महिलांचं कौशल्य पाहून सरकारने त्यांना योग्य काम मिळवून देण्यास मदत करणं अपेक्षित आहे. या विषयी सीमा यांनी स्वत: ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना भूमिका मांडली आहे.
“माझं नाव सीमा गायकवाड आहे. मी नांदेडच्या लहूगावची रहिवासी आहे. आमची गरिबीची परिस्थिती असल्याने मी गवंडी काम करते. मजुरी केली तर 100 रुपये दिवसाला मिळतात. पण गवंडी काम केल्यावर मला 700 रुपये हजेरी मिळतात. मला शासनाकडून आजपर्यंत काही मदत झाली नाही. त्यासाठी मी हे काम करतेय. मी गेल्या 13 वर्षांपासून हे काम करतेय”, अशी माहिती सीमा यांनी दिलीय. सीमा यांनी परिस्थितीमुळे आपल्याला असं काम करावं लागत असल्याचं म्हटलं आहे.