मुलाला हार्ट अटॅक, आजीनेही डोळे मिटले, अंत्यविधींवेळी वडिलांनी प्राण सोडले, आठ दिवसात तीन पिढ्यांचा अंत
अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत आजी, वडील आणि नातू अशा तिघा जणांचा एकामागून एक मृत्यू झाला. या घटनेमुळे वाठोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नांदेड : अवघ्या काही दिवसांच्या काळात एकाच कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू (Family Members Death) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आजी, वडील आणि नातू अशा तिघा जणांचा एकामागून एक मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांना मृत्यूने गाठले. नांदेड जिल्ह्यातील (Nanded) हदगांव तालुक्यातील मनाठा येथे हा प्रकार घडला. एकाच घरातील तीन पिढ्यांमधील सदस्यांचा करुण अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण मुलाचे रेल्वेतून प्रवास करत असताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने (Heart Attack) निधन झाले. त्याच दिवशी आजीचा मृत्यू झाला, तर दशक्रिया विधी करत असताना वडिलांनीही अखेरचा श्वास घेतला. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत आजी, वडील आणि नातू अशा तिघा जणांचा एकामागून एक मृत्यू झाला. या घटनेमुळे वाठोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नामदेव नारायण वाठोरे असे वडिलांचे नाव आहे तर राहुल नामदेव वाठोर हे मुलाचे नाव आहे.
वडील नामदेव वाठोरे यांची आर्थिक स्थिती जेमतेम होती. त्यामुळे त्यांची दोन मुले औरंगाबादला काम करतात. मोठा मुलगा कचरु औरंगाबादलाच राहतो, तर राहुल जालना येथे पेंटिंगचे काम करत असे.
हृदय विकाराच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू
चार मे रोजी कामावर जाताना राहुलला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे रेल्वेतच त्याचा अकस्मात मृत्यू झाला. तरुण मुलाच्या अपमृत्यूने ही बातमी ऐकणाऱ्या सर्वांचेच हृदय हेलावले.
आजीचा वृद्धापकाळाने मृत्यू
दुसरीकडे वयोमानानुसार वडिलांची तब्येत बिघडली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना मुलाच्या अंत्यविधीसाठी गावी आणले. त्याच दिवशी राहुलची आजी कलाबाई यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला.
खचलेल्या वडिलांनी प्राण सोडले
आजारी असलेले नामदेव या घटनेनंतर अधिकच खचले. 10 तारखेला दशक्रिया विधी सुरु असतानाच त्यांचाही मृत्यू झाला आहे. राहुल वाठोरे यांना दोन मुले, पत्नी आहे. मात्र एकाच घरातील तीन व्यक्तींचा एकामागून एक मृत्यू झालयाने कुटुंब आणि गावावर शोककळा पसरली आहे.