Palghar News : समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट दुर्घटनाग्रस्त, एक तरुण बेपत्ता
सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. समुद्राला उधाण आले आहे. असे असताना समुद्रात मासेमारीसाठी जाणे तरुणांना चांगलेच महागात पडले आहे.
जितेंद्र पाटील, पालघर / 27 जुलै 2023 : सध्या देशभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. समुद्राला उधाण आले आहे. समुद्र किनारी जाण्यासही नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मच्छिमारांनाही 31 जुलै पर्यंत मासेमारीवर बंदी केली आहे. मात्र असे असतानाही नको ते धाडस डहाणूतील दोन तरुणांनी केले. भर पावसात मासेमारीसाठी समुद्रात जाणे चांगलेच महागात पडले आहे. मासेमारी गेलेली बोट दुर्घटनाग्रस्त झाली. या दुर्घटनेत एक तरुण बेपत्ता झाला, तर दुसरा पोहत किनाऱ्याजवळ पोहचला. बेपत्ता तरुणाचा कोस्ट गार्डकडून शोध सुरु आहे.
किनाऱ्यापासून काही अंतरावर बोट दुर्घटनाग्रस्त
एक जून ते 31 जुलै हा 61 दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी असताना देखील डहाणूतील दोन तरुण छोटी बोट घेऊन समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. मात्र अचानक काही अंतरावर गेल्यावर ही बोट दुर्घटनाग्रस्त झाली. या बोटीतील एक तरुण पोहत कसाबसा समुद्रकिनाऱ्यावर आला, तर एक तरुण बेपत्ता झाला आहे. बेपत्ता तरुणाचा शोध सध्या कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टर मार्फत घेतला जात आहे.
भूपेंद्र अंभिरे असं बेपत्ता तरुणाचं नाव आहे. त्याच्यासोबत असलेला संजय पाटील हा तरुण पोहत समुद्रकिनाऱ्यावर पोहचला. यानंतर कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरमधून बेपत्ता तरुणाची शोध मोहीम हाती घेण्यात आली. मात्र अजूनही या तरुणाचा शोध लागला नसल्याची माहिती कोस्ट गार्ड करून देण्यात आली.