भय इथले संपत नाही, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर, संपूर्ण शहरात पाणीच पाणी
वसई-विरार शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून प्रचंड पाऊस पडतोय. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनदेखील सतर्क झालं आहे.
पालघर | 20 जुलै 2023 : पावसाने पालघर जिल्ह्याला गेल्या तीन-चार दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढलं आहे. पालघर जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडतोय. पालघरमधील वसई आणि विरार या दोन शहरांमध्ये जिकडे बघावं तिकडे पाणी अशी परिस्थिती आहे. वसई-विरार शहारामध्ये जणू काही पूर आलाय, अशी परिस्थिती आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शहराचे ड्रोनच्या माध्यमातून फोटो काढण्यात आले आहेत. हे फोटो खूप धक्कादायक आणि वस्तुस्थितीची जाणीव करुन देणारे आहेत. समुद्राला भरती आलेली आहे. अशा परिस्थितीत समुद्राचं पाणी शहरात शिरलं आहे. त्यामुळे प्रशासनापुढीलही आव्हानं वाढली आहेत.
वसई-विरार महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त अनिलकुमार पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महापालिकेकडून कशाप्रकारे मदत केली जात आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. “वसई विरार महापालिका कार्यक्षेत्रात मागील 36 तासांमध्ये 400 मिमी पाऊस पडलाय. समुद्राला भरती आली असल्यामुळे शहरात समुद्राचं पाणी येत आहे”, अशी माहिती अनिलकुमार पवार यांनी दिली.
प्रशासनाकडून नागरिकांसाठी ट्रॅक्टर, बलेरो आणि इतर वाहनांची मोफत सुविधा
“शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचलंय. पण प्रशासनाकडून संबंधित ठिकाणी दळणवळणाची साधने उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेचे ट्रॅक्टर, ट्रॅक, बुलेरो गाड्या किंवा इतर गाड्या उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ज्यांना नोकरी किंवा इतर कामासांठी रेल्वे स्टेशनला जायचं आहे त्यांच्यासाठी वाहनांची मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे”, अशी माहिती महाापालिका आयुक्तांनी दिली.
23 कुटुंबाची गोशाळेत व्यवस्था
“एनडीआरएफच्या टीम तैनात आहे. राजवली परिसरातील 23 कुटुंबाची तेथील नजिकच्या एका गोशाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मेडिकल कॅम्पही लावण्यात आला आहे. राजवली येथे आणखी पाच कुटुंब अडकले आहेत. त्यांनादेखील सुरक्षित स्थळी नेण्याचं काम सुरु झालं आहे”, असं आयुक्तांनी सांगितलं.
मिठागर परिसरात पाणी साचलं
“वसईच मिठागरचा परिसर आहे. तिथे 500 पेक्षा जास्त नागरीक वास्तव्यास आहेत. या परिसरातही पाणी साचलं आहे. आम्ही तिथल्या नागरिकांच्या घरी जेवण पोहोचवलं आहे. आमचं सुविधा पुरवण्याचं काम सुरु आहे. नागरिकांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवण्याचां काम सुरु आहे”, अशी माहिती महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली.
दुपारनंतर पाऊस थांबला, पण वसईचा मुख्य रस्ता पाण्याखालीच
वसई, विरार, नालासोपारामध्ये दुपारनंतर पाऊस थांबला आहे. मात्र वसईचा मुख्य रस्ता सायंकाळनंतरही पाण्याखाली आहे. वसई ते वसई फाटा महामार्गाकडे जाणारा मुख्य रस्ता सायंकाळी 6 नंतर ही पाण्याखाली होता. या रसत्यावर गुडघाभर पाणी साचलेलं आहे. वसईच्या औद्योगिक वसाहतीमधील चाकरमान्यांना मात्र रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावर बस, कार, मोटारसायकल या बंद पडत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
अनेक गाड्या पाण्यात अपघात होऊन पडत आहेत. सायंकाळी कामावरून सुटलेल्या चाकरमान्यांना 2 ते 3 किलोमीटर गुडग्या इतक्या पाण्यातून रेल्वे स्टेशन गाठावे लागले. विशेष म्हणजे महापालिकेने नागरिकांच्या व्यवस्थेसाठी कोणतीही व्यस्था केली नसल्याने नागरिकांनी यावेळी संताप व्यक्त केला आहे.