नातवंडं म्हणाली, आजी नव्वदी झालेय, गडाखालीच थांब, कोरोनाला हरवलेल्या आजींनी पोरांना मागे टाकलं
वयाची नव्वदी पार केलेल्या पंढरपूरच्या दमयंती भिंगे आजींना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. (Pandharpur old lady climbs Koraigad)
पंढरपूर : दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना संसर्गावर मात केलेल्या पंढरपूर येथील 90 वर्षांच्या आजीबाईंनी चक्क गड सर केला. दमयंती भिंगे यांनी समुद्र सपाटीपासून सुमारे 3 हजार 50 फूट उंचीवर असलेला लोणावळा भागातील कोराईगड सर केला. कोरोना काळात पसरलेल्या नकारात्मकतेच्या पार्श्वभूमीवर आजींनी सकारात्मक ऊर्जा दिली आहे. (Pandharpur 90 years old lady Damayanti Bhinge climbs Koraigad Lonavala)
कोरोनावर आजींची मात
वयाची नव्वदी पार केलेल्या पंढरपूरच्या भिंगे आजींना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. दमयंती भिंगे यांना कोणताही आजार नव्हता. ना ब्लड प्रेशर, ना डायबिटीस. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार आणि संतुलित आहार घेतला. सोबत प्राणायमही केला. घरकामात कायम व्यस्त असणाऱ्या आजी अत्यंत धार्मिक वृत्तीच्या आहेत.
घाबरलेल्या कुटुंबालाही आजींनीच सावरलं
कोरोना संसर्गानंतर भिंगे आजींच्या घरची सारी मंडळी घाबरुन गेली. परंतु आलेल्या संकटाला धैर्याने तोंड द्यायचे, असा स्वभाव असलेल्या आजी बिलकूल घाबरल्या नाहीत. उलट आपल्याला काही होणार नाही, आयुष्यात अशा अनेक संकटांना धैर्याने तोंड देत आले आहे. कोरोनावरही नक्कीच विजय मिळवेन, असं सांगून त्यांनीच कुटुंबीयांना धीर दिला.
कोराईगड चढण्याचा प्लॅन
डॉक्टरांच्या सल्ल्याने आजींना पंढरपुरातील हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. आठ ते दहा दिवसांच्या योग्य उपचारानंतर त्यांना घरी आणले. कोरोनावर मात केल्यानंतर आजी दोन महिन्यांनी नातवंडांसह चक्क लोणावळा येथे फिरायल्या गेल्या. नातवंडांनी जवळच असलेला कोराईगड चढण्याचा प्लॅन केला.
उत्साही आजीसह नातवंडांची फौज
आजीला गड चढता येणार नाही या विचाराने त्यांचा नातू अभिजीत उर्फ भैय्या याने “आजी आम्ही कोराईगडावर जाणार आहे. तुला गड चढायला जमणार नाही, तू येऊ नकोस” असे सांगितले. परंतु आजी कुठल्या ऐकतात. त्या म्हणाल्या, पोरांनो मला काही त्रास होत नाही, मी पण तुमच्या सोबत गडावर येणार. मग नातवंडांचाही नाईलाज झाला. उत्साही आजीला सोबत घेऊन नातवंडांनी गड काबीज करायचे ठरवले. (Pandharpur old lady climbs Koraigad)
विशेष म्हणजे कोरोनाच्या आजारातून बाहेर आलेल्या आजींनी नातवंडांच्या समवेत झपाझप पावले टाकत मोठ्या जिद्दीने गड सर केला. सध्याच्या परिस्थितीत भिंगे आजींची ही गड चढाई इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
संबंधित बातम्या :
हम बहुत छोटे लोग, हेलिकॉप्टरसे आते नही, 79 व्या वर्षी कोश्यारींनी पायीच शिवनेरी केला सर
तीन पिढ्या सोबतीला, 80 वर्षांच्या आजींकडून सव्वादोन तासांत रांगणागड सर
(Pandharpur 90 years old lady Damayanti Bhinge climbs Koraigad Lonavala)