Nanded Crime : नांदेडमध्ये आढळले पाकिस्ताननगरचे पार्सल, जिल्ह्यात खळबळ; जाणून घ्या व्हायरल पोस्टमागचे तथ्य
कुरिअरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली. हा सर्व प्रकार पोलिसांपर्यंत पोहचला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान संबंधित कपडे पार्सल मागवणाऱ्या शेख खलील या युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे उघड झाले.
नांदेड : ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) करताना आपला पत्ता (Address) जरा काळजीपूर्वक तपासून टाका. कारण असाच एका पार्सलवर टाकलेल्याल्या पत्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नांदेड शहरातील देगलूर नाका भागातील एका 25 वर्षीय शेख खलील या तरुणाने आपल्या भावाच्या लहान मुलासाठी ऑनलाईन कपडे मागवले होते. या कपड्याची डिलिव्हरी कोलकाता येथून होणार होती. पण शेख खलील या तरुणाला लिहिता वाचता येत नसल्यामुळे त्याने मोबाईलमधून व्हाईस रेकॉर्ड करून संबंधित कंपनीला त्याचा पत्ता त्या अॅपवर पाठवला. परंतु समोरील कंपनीकडून खलील याच्या नावाखाली त्याच्या पाकिजानगर ऐवजी, पाकिस्ताननगर नांदेड असा पत्ता गैरसमजुतीतून टाकण्यात आला. कपड्याचे कुरिअर शेख खलील याला मिळाल्यानंतर त्या कुरिअरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे.
जाणून घ्या व्हायरल पोस्टचे सत्य
कुरिअरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली. हा सर्व प्रकार पोलिसांपर्यंत पोहचला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान संबंधित कपडे पार्सल मागवणाऱ्या शेख खलील या युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे उघड झाले. नांदेड शहरात किंवा जिल्ह्यात पाकिस्ताननगर नावाचे कुठलेही नगर नाही. नांदेड शहरात देगलूर नाका भागात पाकिजानगर आहे. हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धबडगे यांनी सांगितले. सोशल मीडियावर अशा कुठल्याही अफवा किंवा जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट टाकू नये. तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक धबडगे यांनी दिला आहे.