मोठी बातमी ! राज ठाकरे यांचं अटक वॉरंट रद्द; इतका ठोठावला दंड
अटक वॉरंट रद्द करताना परळी कोर्टाने राज ठाकरे यांना 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणावर आता येत्या 23 जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याचं त्यांच्या वकिलाने सांगितलं.
परळी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परळी कोर्टाने राज ठाकरे यांचं अटक वॉरंट रद्द केलं आहे. राज ठाकरे यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी कोर्टात सुनावली झाली होती. दोन सुनावणीवेळी राज ठाकरे कोर्टात उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. त्यामुळे राज ठाकरे आज कोर्टात हजर राहिले. यावेळी राज यांच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादानंतर राज यांचं अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे.
अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर राज ठाकरे आज परळी कोर्टात हजर राहिले होते. सकाळी 11 वाजता राज ठाकरे कोर्टात हजर झाले. त्यानंतर राज ठाकरे यांच्या वकिलाने जोरदार युक्तिवाद करत अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर कोर्टाने हे अटक वॉरंट रद्द केलं आहे.
म्हणून गैरहजर राहिले
कोरोना काळ होता आणि लिलावती रुग्णालयात अॅडमिट असल्याने राज ठाकरे कोर्टात हजर राहू शकले नव्हते. मात्र, आज ते हजर झाले आहेत. त्यामुळे त्यांचं अटक वॉरंट रद्द करण्यात यावं, असा युक्तिवाद राज ठाकरे यांच्या वकिलाने केला. त्यानंतर कोर्टाने निर्णय दिला. या प्रकरणी कोर्टाने काहीच विचारलं नसल्याचंही वकिलाने सांगितलं.
500 रुपये दंड
अटक वॉरंट रद्द करताना परळी कोर्टाने राज ठाकरे यांना 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणावर आता येत्या 23 जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याचं राज ठाकरे यांच्या वकिलाने सांगितलं.
अन् एकच जल्लोष झाला
दरम्यान, राज ठाकरे यांचं अटक वॉरंट रद्द झाल्यानंतर राज ठाकरे कोर्टाबाहेर आले. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घालत एकच जल्लोष केला. यावेळी राज साहेब जिंदाबाद, राज ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यामुळे परळी कोर्ट परिसर घोषणांनी दणाणून गेला होता.
दरम्यान, या सुनावणीनंतर राज ठाकरे आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते दुपारी एक ते दीडच्या सुमारास मुंबईकडे जाण्यासाठी रवाना होणार आहे.