चंद्रपूर : जिल्ह्यातील महाऔष्णिक वीज केंद्राच्या (Thermal Power Station) प्रदूषणाचा परिणाम हा फक्त चंद्रपूर जिल्ह्यावर होत नाही. त्याचा परिणाम हा थेट नागपूर, पुणे आणि मुंबई वर झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका स्वयंसेवी संस्थेने काढलाय. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी ऍण्ड क्लीन एअर (Research on Energy and Clean Air) या संस्थेने अभ्यास करून हा निष्कर्ष काढलाय. महाऔष्णिक वीज केंद्रातून निघणारे SPM, सल्फर डायऑक्साइड (Sulfur Dioxide), नायट्रोजन डायऑक्साइड आणि मर्क्युरी सारखे प्रदूषणकारी घटक हवेच्या माध्यमातून या शहरांपर्यंत पोहोचविले जातात. त्यामुळे या शहरातील लोकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम झाल्याचा या संस्थेचा दावा आहे. या वायू प्रदूषणामुळे 2020 या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात 85, नागपूर जिल्ह्यात 62, यवतमाळ येथे 45, मुंबईत 30 आणि पुणे आणि नांदेड मध्ये प्रत्येकी 29 जणांचा अकाली मृत्यू झाल्याचा निष्कर्ष या संस्थेने आपल्या अहवालात मांडला आहे.
आरोग्यावर होणाऱ्या परिमाणामुळे या वर्षभरात 8 लाख वैद्यकीय रजा घेण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलंय. त्यामुळे महाऔष्णिक वीज केंद्राचे मुदतबाह्य झालेले 3आणि 4 क्रमांकाचे संयंत्र बंद करण्याची आणि सल्फर कमी करण्यासाठी तातडीने यंत्रणा उभारण्याची मागणी CREA चे विश्लेषक सुनील दहिया तसेच पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी केली आहे.
एकीकडे पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी कालबाह्य झालेले वीज संच तातडीने बंद करण्याची मागणी रेटली. असे असताना गेली अनेक वर्षे याच विषयावर केवळ चर्चा ऐकत असलेल्या चंद्रपूरकर नागरिकांनी मात्र हा जीवघेणा खेळ तातडीने थांबविण्याची मागणी केली आहे. प्रदूषण करणारे हे उद्योग सरकारी असल्याने या काळजीत अधिक भर पडल्याचे मत डॉ. योगेश्वर दुधपचारे व किशोर जामदार यांनी व्यक्त केले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र नव्हे तर राज्यातील इतरही औष्णिक वीज केंद्रे अशाच पद्धतीने प्रदूषणात भर घालत असल्याचे चित्र आहे. कोळसा आधारित वीज केंद्रे आता मानवाच्या जीवावर उठल्याचेही अहवालाने अधोरेखित केले आहे.