या चार पोरींना खोऱ्याने पैसा… महाराष्ट्राच्या लोककलेची गौतमी पाटील करू नका; कुणी केलं आवाहन?
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या लोककलेची गौतमी पाटील करू नका, असं आवाहन रघुवीर खेडकर यांनी केलं आहे.
अहमदनगर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असते. आधी तिच्या नृत्यावर आक्षेप घेण्यात आला. तिचं नृत्य अश्लील असल्याचं सांगितलं गेलं. तिने माफीह मागितली आणि नृत्यात बदलही केला. हा वाद थांबत नाही तोच ऊर्फीच्या कार्यक्रमाला मिळणाऱ्या प्रतिसादावर टीका होऊ लागली. थेट कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनीच गौतमीवर टीका केली. गौतमी तीन गाण्याला तीन लाख घेते. आम्ही पाच हजार रुपये वाढवून मागितले तर बाजार मांडला म्हटलं जातं, अशी खदखद इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केली. इंदुरीकर महाराजांची टीका थांबत नाही तोच आता ज्येष्ठ तमासा कलावंत रघुवीर खेडकर यांनी गौतमीवर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या लोककलेची गौतमी पाटील करू नका, असं आवाहन रघुवीर खेडकर यांनी केलं आहे.
रघुवीर खेडकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना हे आवाहन केलं आहे. महाराष्ट्राची कला कुठे चालली आहे? महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का? असा संतप्त सवाल ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी विचारला आहे. ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर परखड मत मांडले आहे. 100 कलावंतांच्या तमाशाला दोन लाख रूपये मानधन मिळेना. या चार पोरीना खोऱ्याने पैसा मिळत आहे. महाराष्ट्राच्या लोककलेची गौतमी पाटील करू नका, असं आवाहन रघुवीर खेडकर यांनी केलं आहे.
ते खेदजनक आहे
सध्या गौतमी पाटील महाराष्ट्रमध्ये चांगलीच फेमस झाली आहे. तिच्या गाण्याच्या कार्यक्रमाला लाखो रुपये बिदागी मिळत असल्याच्या बातम्या व्हायरल होत असताना आता ज्येष्ठ कलावंत रघुवीर खेडकर यांनीही याबाबत आपले मत नोंदवले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही महाराष्ट्राची पारंपारिक लोककला जपण्यासाठी शंभर शंभर कलावंत घेऊन कार्यक्रम करत असतो. मात्र तेव्हा बिदागी द्यायला लोक हात कचरतात. मात्र गौतमी पाटीलला काही गाण्यासाठी लाखो रुपये देतात ही गोष्ट खेदजनक आहे, असं खेडकर म्हणाले.
बिहार होऊ देऊ नका
तसेच आपली मुलं कोणत्या वळणावर चालली हे पालकांसह राज्यकर्त्यांनी पाहण्याची गरज आहे. तमाशा कलावंत आतापर्यंत आपल्या मर्यादा सांभाळून गाणे सादर करतात. मात्र आजकालचे गाणे कुठल्या थराला गेली आहे हे पाहण्याची गरज आहे. महाराष्ट्राचे बिहार होऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.