गच्चीवरुन पूर पाहताना तोल गेला, पाण्यात पडून महाडमध्ये 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
रायगड जिल्ह्यात महाड शहरातील रोहिदास नगर भागात ही घटना घडली. 50 वर्षीय संजय नारखेडे गच्चीवरुन पुराच्या पाण्यात पडले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रायगड : महाड शहरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असतानाच पुराचा पहिला बळी गेला. टेरेसवरुन पुराच्या पाण्यात पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गच्चीवरुन वाकून पाहत असताना तोल जाऊन खाली कोसळल्यामुळे 50 वर्षीय व्यक्तीला प्राण गमवावे लागले.
रायगड जिल्ह्यात महाड शहरातील रोहिदास नगर भागात ही घटना घडली. 50 वर्षीय संजय नारखेडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नारखेडे आपल्या इमारतीच्या टेरेसवरुन वाकून पाहत पुराच्या पाण्याचा अंदाज घेत होते. मात्र अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट खाली कोसळल्याची माहिती आहे. महाडमधील खासगी रुग्णालयात संजय नारखेडे यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.
चार जण बेपत्ता, चौघांचे मृतदेह सापडले
रायगड जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसांपासून अतिवृष्टीमुळे एकूण आठ बेपत्ता झाले होते. त्यापैकी चार जणांचे मृतदेह हाती लागले असून अद्याप चार जणांचे शोधकार्य पोलीस, प्रशासन, स्थानिक रेस्क्यू टीमच्या सहाय्याने सुरु आहे.
रायगडमध्ये पावसाचा जोर
दरम्यान, महाड शहरात पावसाचा जोर दिसत आहे. तटरक्षक दलाची 2 पथके महाडकडे रवाना झाली आहेत. कोलाड येथील महेश सानप यांचे बचाव पथकही महाडला रवाना झाले आहे. दुसरीकडे, नागोठणे शहर जलयम झाले असून मरीआई मंदीर, बाजारपेठ, एसटी स्थानक परिसरासह शहरात अनेक ठिकाणी पाणी भरले आहे.
पोलादपूर शहरात जुन्या महाबळेश्वर रस्त्यावर पाणी आले आहे. पोलादपूर सिद्धेश्वर अळीमध्ये बुधवारी रात्री घरात दोन फुटांपर्यंत पाणी आले होते, पण आता पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पावसाचा जोर पुन्हा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
रायगडमधील पावसाचे अपडेट्स
बाजीरे धरण (पोलादपूर) पहाटे 4 वाजता पाणी पातळी 58.30 मीटर, धरणाने धोक्याची पातळी (58 मीटर) ओलांडली
पोलादपूर शहरात जुन्या महाबळेश्वर रस्त्यावर पाणी
पेण तालुक्यातील आपटा येथील पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ
खालापुरातील सावरोली पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद.
पाली वाकण मार्गावरील वाहतूक बंद.
कर्जत खोपोली रेल्वे सेवा बंद.
नागोठणे येथे पूरस्थिती.
कुंडलिका, आंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास नदीच्या पातळीत वाढ.
संबंधित बातम्या :
Raigad Rain | रायगडमध्ये अतिवृष्टीचा कहर, 5 जण बेपत्ता, शोध मोहीम सुरु
आईच्या डोळ्यादेखत दोन चिमुरडी नाल्यात वाहून गेली, रायगडमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना
(Raigad Rain Mahad City 50 years old man falls in flood water while watching from terrace)