रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीत जाहीर सभा पार पडली. राज ठाकरे यांनी कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला अप्रत्यक्षपणे विरोध केला आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावर मोठं भाष्य केलंय. ते म्हणाले, राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता तो संपला. मी निवडणूक लढवणार नाही, असं शरद पवार म्हणाले होते. समोर शरद पवार होते. तेव्हा लोकं म्हणाले, त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे. यावेळी शरद पवार यांना खरचं राजीनामा द्यायचा होता, असं मला वाटतं. पण, राजीनामा दिल्यानंतर अजित पवार जे वागलेत. ये तू गप्प बस. ये तू शांत बस. माईक हातात घेतला. हे सगळं पवार साहेबांच्या डोळ्यादेखत होत होतं.
तेव्हा शरद पवार यांना असं वाटलं असणार. अरे मी आता राजीनामा दिला. हा माणूस असा वागतोय. खरचं जर दिला तर हा माणूस उद्या मला हे सांगेल. ये तू गप्प बस, अशी नक्कल राज ठाकरे यांनी अजित पवार यांची केली. मला असं वाटतं, या भीतीपोटी शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला असेल. आता असं वागतोय. तर मग कसा वागेल. काही जणांना उखळ्या फुटत होत्या. जे होतंय ते बरं होतंय.
शंभर एकरची जमीन निघून जाते. पायाखालचे हजारो एकराचे पॅचेस निघून जातात तुम्हाला समजत नाही? कळत नाही कोणीतरी विकत घेत आहे म्हणून? सगळ्या लोकप्रतिनिधींना पहिल्यांदा कळतं की प्रकल्प येत आहेत. ते कवडीमोल भावात तुमच्याकडून जमिनी खिशात घालतात. ज्यावेळी प्रकल्प जाहीर होतो तेव्हा हजारपट मोबदला घेऊन मोकळे होतात. नुसता व्यापार चालू आहे, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
नाणारमध्ये प्रकल्प आणणार होते. विरोध झाला. आता नाणारला आणला. माझ्याकडे आज कलेक्टर आले होते. त्यांना विचारलं बारसूला किती जमीन हातात आली? ते म्हणाले 1000 एकर आली. कशी आली? मुंबईहून गणपतीला कोकणाला येता. तेव्हा चर्चा करता. तेव्हा तुमची जमीन गेलीय ते समजत नाही? याच लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र तुमच्यासमोर फिरत असतात. कवडीमोल किंमतीत जमिनी विकत घेतात. मग सरकारला बड्या दामात विकतात, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.