रत्नागिरीतील बेपत्ता नौकेचे गूढ वाढले, समुद्रात अपघाताचा संशय, मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी पत्र
या अपघाताची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिण्यात आलं आहे. भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे.
रत्नागिरी : जवळपास दहा दिवसांपासून रत्नागिरी जवळच्या जयगड समुद्रातून बेपत्ता झालेल्या नौकेचे गूढ आणखी वाढले आहे. कारण आता या बोटीला समुद्रात अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बेपत्ता असलेल्या मच्छिमारी बोटीला मोठ्या मालवाहू जहाजाची टक्कर बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या अपघाताची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिण्यात आलं आहे. भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. नविद-2 नावाची मच्छिमारी बोट 26 ऑक्टोबरपासून बेपत्ता आहे. या बोटीवर एकूण आठ खलाशी होते, त्यातील एकाचा मृतदेह चार दिवसांपूर्वी समुद्रात सापडला होता.
खलाशाचा मृतदेह सापडला
रत्नागिरीतील नौकेवरील एका खलाशाचा मृतदेह 31 ऑक्टोबरला सापडला होता. 45 वर्षीय अनिल आंबेरकर यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे, तर उर्वरित खलाशांचा शोध अद्यापही सुरु आहे. 26 ऑक्टोबरपासून जयगडमधील मासेमारी बोटीचा संपर्क तुटल्याने चिंतेचं वातावरण आहे. नविद-2 या नौकेवर तांडेलसह आठ खलाशी आहेत. मात्र एका खलाशाचा मृतदेह सापडल्यानंतर बेपत्ता बोटीविषयी भीती वाढली होती.
समुद्रात गेलेली नौका बेपत्ता
नविद-2 ही नौका मासेमारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथून 26 ऑक्टोबरला समुद्रात गेली होती. मात्र जवळपास अकरा दिवस उलटले आहेत. नौकेशी कोणताही संपर्क न झाल्याने बोट मालकाने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट आणि काही खासगी बोटींनी युद्ध पातळीवर ‘सर्च ऑपरेशन’ सुरु केले.
संपर्क साधण्याचे आवाहन
नासीर हुसैन मिया संसारे यांच्या मालकीची ही मासेमारी नौका आहे. स्थानिक मच्छिमारांनी शोध मोहीम सुरु केली आहे. कोणाला काही माहिती मिळाल्यास जयगड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या बोटीवर तांडेल दगडु, गोविंद, दत्ता, अमोल, सूर्या, अनिल असे खलाशी आहेत. हे सर्व साखरी आगर येथील राहणारे आहेत. त्यापैकी अनिल आंबेरकर यांचा मृतदेह सापडला आहे.
संबंधित बातम्या :
रत्नागिरीतील नौका समुद्रात बेपत्ता, सहा खलाशांसोबत पाच दिवसांपासून संपर्क नाही
बिहारमध्ये गंगा नदीत मोठी दुर्घटना, 100 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, अनेक जण बेपत्ता
गणपती विसर्जनाला गालबोट; मुंबईत 5 मुले बुडाली; दोघांना वाचविण्यात यश, तर तिघे अद्याप बेपत्ता