Mumbai Goa Highway | कोकणात मुसळधार, मुंबई-गोवा महामार्ग बंद, आता हा पर्यायी मार्ग
Mumbai Goa Highway Update News In Marathi | पावसाने कोकणाला चांगलंच झोडपून काढलय. गेल्या काही तासांमध्ये कोकणात जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे वाहतुकीसाठी मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.
रत्नागिरी | मुंबईसह राज्यात दिवसभरात जोरदार पाऊस कोसळतोय. राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. जोरदार पाऊस झाल्याने पाणीपुरवठा करणारे तलाव भरले आहेत.त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलंय. तसेच पुढील 24 तासात मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र त्याआधीच सुरु असलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
रत्नागिरीत गेल्या काही तासांपासून सातत्याने पाऊस होतोय. त्यामुळे रत्नागिरीतील काजळी नदीला पूर आला आहे. काजळी नदी भरभरुन वाहतेय. काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी पूल हा वाहतूकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ही अंजनारी पूलाच्याआधी थांबवण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहतूकदारांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.
हा आहे पर्यायी मार्ग
आता मुंबई-गोवा महामार्ग बंद करण्यात आल्याने रत्नागिरीला जाणारी वाहतूक ही पावस मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.
राज्यात आतापर्यंत किती पाऊस?
राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 104 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील 178 तालुक्यांत सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालाय. तर 130 तालुक्यांमध्ये 75 ते 100 टक्के, 58 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे. राज्यात आतापर्यंत 120 लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची आकडेवारी ही एकूण सरासरीच्या 85 टक्के इतकी आहे.
‘या’ जिल्ह्यात कमी पेरणी
दरम्यान राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये अधिक तर 4 जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी पेरणी झाली आहे. जळगाव, बीड, यवतमाळ, नांदेड आणि बुलढाणा येथे अधिक पेरणी झाली आहे. तर ठाणे, पुणे, सोलापूर आणि गडचिरोली येथे कमी पेरणी झाली आहे. तर सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनची झाली आहे. सोयाबिनची पेरणी ही 111 टक्के इतकी झाली आहे. तर कापसाची 96 टक्के पेरणी झालीय, अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली.