गुलाबराव पाटील गुवाहाटीला शेण खायला गेले होते का?, मुख्यमंत्र्यांचा सरपंच झालाय; शेतकरी नेत्याचा घणाघाती हल्लाबोल
यावेळी तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही तोफ डागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरपंच झालाय. ज्याप्रमाणे सरपंच याला फोन लाव, त्याला फोन लाव, नालीत पाणी गेले की फोन लाव, तसेच आपले मुख्यमंत्री करत असतात.
बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गुलाबराव पाटील हे गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? असा संतप्त सवालच रविकांत तुपकर यांनी केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. उठसूठ कुणालाही फोन करत असतात. मुख्यमंत्र्यांचा सरपंच झालाय, असा घणाघाती हल्लाही रविकांत तुपकर यांनी चढवला आहे.
रविकांत तुपकर आणि त्यांचे सहकारी अकोला तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचे ठिकठिकाणी धुमधडाक्यात स्वागत केले जात आहे. तुपकर हे काल बुलढाण्यात पोहोचले. तेव्हा कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, अंगावर फुलांचा वर्षाव करत आणि घोषणा देत तुपकर यांचं जल्लोषात स्वागत केलं.
ढोलाच्या तालावर तुपकर यांची पायी मिरवणूक काढण्यात आली. जनसंपर्क कार्यालयात आले असता तुपकर यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर तुपकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते गुलाबराव पाटील यांच्यापर्यंत सर्वांचीच पिसे काढली.
गुलाबराव पाटील यांनी तूपकर यांच्या आंदोलनाला नौटंकी आंदोलन म्हटले होते. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याचा तुपकर यांनी तुरुंगातून बाहेर पडताच कडक शब्दात समाचार घेतला. गुलाबराव पाटील तुमचे घर काचेचे आहे. तुम्ही गुवाहाटीला शेण खायला गेले होते का?, अशी जोरदार टीका तुपकर यांनी केली.
ठाकऱ्यांशी गद्दारी केली, आम्हाला शिकवू नका
ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी पानटपरी चालवणाऱ्या गुलाबराव पाटील यांना अनेकवेळा मंत्री केले, त्यां ठाकरे कुटुंबासोबत तुम्ही गद्दारी केलीय. जे उपकार करणाऱ्या ठाकऱ्यांचे झाले नाहीत, त्यांनी आम्हाला शिकवू नये. योग्यवेळी तुम्हाला जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराच तुपकर यांनी दिला.
बॉसच्या सांगण्यावरून लाठीमार
यावेळी तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही तोफ डागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरपंच झालाय. ज्याप्रमाणे सरपंच याला फोन लाव, त्याला फोन लाव, नालीत पाणी गेले की फोन लाव, तसेच आपले मुख्यमंत्री करत असतात. आपले मुख्यमंत्री तर थानेदारालाही फोन लावतात. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पदाची गरिमा घालविली आहे.
मुख्यमंत्री तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फोन केला की सुसाट सुटतात. पोलिसांनी आमच्यावर केलेला लाठीमार हा बॉसच्या सांगण्यावरून केला, असा आरोपही त्यांनी केला.