टोमॅटो खाल्ला नाही तर सुनील शेट्टी मरणार नाही; रविकांत तुपकर संतापले
ठोक बाजारात 40 वर्षांत पहिल्यांदा टोमॅटोचे दर प्रति कॅरेट 2500 रुपयांवर जाणार आहेत. आणखी 15 दिवस टोमॅटोची दरवाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बुलढाणा : टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याचा परिणाम आमच्या किचनवरही झाला आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता सुनील शेट्टीने व्यक्त केली होती. त्यावरून शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. नेटकऱ्यांनीही सुनील शेट्टींवर जोरदार तोफ डागली आहे. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनीही सुनील शेट्टी यांच्यावर केली. त्यानंतर आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही सुनील शेट्टींवर जोरदार टीका केली आहे. टोमॅटो खाल्ला नाही तर सुनील शेट्टी मरणार नाही, अशी जहरी टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे.
टोमॅटोचे भाव वाढल्याने अभिनेता सुनील शेट्टीने हा जागतिक विषय केलाय. सुनील शेट्टीने टोमॅटोचे भाव वाढल्याने त्यांच्या पत्नीचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे, असं म्हटलं आहे. जर भाव वाढले असतील तर सुनील शेट्टीने टोमॅटो खाऊ नये, शेट्टी काही मरणार नाही, मात्र शेतकऱ्यांची टिंगल टवाळी करू नये, अशा शब्दात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अभिनेता सुनील शेट्टीला खडसावले आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
त्यांच्या बुद्धीची किव येते
दोन चार वर्षात एखादाच महिना असा येतो की टोमॅटो किंवा कांद्याचे भाव वाढतात. त्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात. इतर वेळी भाजीपाला रस्त्यावर फेकून द्यावा लागतो. मात्र शहरी भागातील लोक हे त्यांचे भांडवल करतात, त्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येते, असा हल्लाच तुपकर यांनी चढवला आहे.
बाजारू माणूस
दरम्यान, शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनीही सुनील शेट्टीवर जहरी टीका केली होती. सुनील शेट्टी सिने कलावंत नाही बाजारू माणूस आहे. शेतकऱ्याची भूमिका साकारण्यासाठी कोट्यवधी रुपये घेता, मग शेतकऱ्याला चार पैसे मिळाले तर पोटात दुखतंय का?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला होता. सडक्या विचाराचा सुनील शेट्टी भिक मागायला आला तर त्याला सडके टोमॅटोच द्या, असं आवाहनही खोत यांनी केलं आहे.
15 दिवस दरवाढ राहणार
दरम्यान, नागपूरच्या कॅाटन मार्केटमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या टोमॅटोची आवक पूर्णपणे बंद झाली आहे. महागाईत नागपूरकरांना आंध्राप्रदेशच्या टोमॅटोचा आधार मिळत आहे. नागपूरच्या ठोक बाजारात आंध्राचे टोमॅटो 100 ते 115 रुपये किलोने मिळत आहेत. पण किरकोळ बाजारात टोमॅटोचा दर 150 ते 175 रुपये किलो आहे. ठोक बाजारात 40 वर्षांत पहिल्यांदा टोमॅटोचे दर प्रति कॅरेट 2500 रुपयांवर जाणार आहेत. आणखी 15 दिवस टोमॅटोची दरवाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळी पिकाचे नवे टोमॅटो बाजारात येईपर्यंत दरवाढ कायम राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.