लातूर शासकीय रुग्णालय : दिवा, धूर आणि अफवा; जाणून घ्या नेमकं काय घडलं?
नवजात शिशु अतिदक्षता विभागातील सर्व बालके तसेच रुग्णालयातील इतर रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, रुग्णालयातीस सर्व कर्मचारी सुखरुप आहेत. तसेच रुग्णालयातील मालमत्तेचेही कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली.
लातूर : लातूरमधील विलासराव देशमुख आरोग्य विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात आज आगीची अफवेमुळे रुग्णालय प्रशासनासह रुग्ण आणि नातेवाईकांची चांगलीच तारांबळ उडाली. फायर अलार्म वाजल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाने धूर आटोक्यात आणल्यानंतर पाहिले असता देवाजवळ लावलेल्या दिव्यामुळे कागद पेटल्याचे कळले अन् सर्वांचा जीव भांड्यात पडला.
नेमके काय घडले?
लातूरचे विलासराव देशमुख आरोग्य विज्ञान संस्थेचे रुग्णालय. सायंकाळचे चार वाजले होते. रुग्णालयात दररोजचे रुटीन सुरु होते. डॉक्टर रुग्णांना तपासत होते. नर्स संध्याकाळचे औषध रुग्णांना देत होत्या. डॉक्टरांनी रुग्णांना तपासल्यानंतर रिपोर्ट कार्डवर नोंद करीत होत्या. चहाची वेळ असल्याने रुग्णालयातील रुग्णांना चहा वाटप सुरु होते. आया, वॉर्डबॉय कुणी चहाचे घोट घेत होते तर कुणी रुग्णांची सुश्रुषा करीत होते. सर्व रुटीन आलबेल सुरु असतानाच अचानक रुग्णालयातील फायर अलार्म वाजला आणि रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर, नर्स, कर्मचारी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. फायर अलार्मच्या दिशेने धाव घेतली असता समोरील धूर पाहिला आणि डॉक्टर, नर्ससह सर्वांचीच एकच तारांबळ उडाली. तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलानेही कार्यतत्परतेने धूर आटोक्यात आणला आणि धूराच्या दिशेने आत जाऊन पाहिले अन् सर्वांनीच हुश्श केले. केवळ कागद जळाल्याने धूर निघत असल्याचे स्पष्ट झाले.
आग कशी आणि कुठे लागली?
रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता कक्षासमोरच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे स्टाफ रुम आहे. या स्टाफ रुममध्ये देवीचा फोटो आहे, जिथे नियमित दिवा लावला जातो. सायंकाळी 4 च्या सुमारास स्टाफपैकी कुणीतरी देवीच्या फोटोसमोर लावला. दिवा लावल्यानंतर ती व्यक्ती रुम बंद करुन आपल्या कामाला निघून गेली. त्यानंतर हा दिवा कलंडला आणि जवळच ठेवलेल्या कागदांवर पडला. पेटता दिवा पडल्याने कागदांनी पेट घेतला आणि धूर रुमबाहेर पडू लागला. धूर सर्वत्र पसरू लागल्यानंतर कक्षात बसवलेला फायर अलार्म वाजला. फायर अलार्म वाजल्यानंतर स्टाफ रुमचा दरवाजा उघडण्यात आला. त्यानंतर धूर आणखीनच पसरु लागला. धूर पाहून डॉक्टर, नर्स, रुग्ण, नातेवाईक सर्वांचीच जीवाच्या भीतीने भंबेरी उडाली. स्टाफ रुमच्या समोरच 4 फुटांवर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षात 37 बालके उपचार घेत आहेत. या सर्व बालकांना रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि रुग्णालय कक्ष प्रमुख डॉ. डोपे, डॉ.हळणीकर यांनी प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवले. त्यापैकी एक शिशु व्हेंटिलेटरवर होते. मात्र त्यालाही सुरक्षित हलविण्यात आले.
कोणतेही मालमत्ता नुकसान किंवा जीवितहानी नाही
नवजात शिशु अतिदक्षता विभागातील सर्व बालके तसेच रुग्णालयातील इतर रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, रुग्णालयातीस सर्व कर्मचारी सुखरुप आहेत. तसेच रुग्णालयातील मालमत्तेचेही कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली. या घटनेनंतर लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली व समाज माध्यमांमध्ये सुरू असलेल्या अफवेला पूर्णविराम देण्याची विनंती केली. (Rumors of fire at Latur Vilasrao Deshmukh Government Hospital)