संभाजीराजे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात बंददाराआड चर्चा, जवळीक वाढणार?; चर्चांना उधाण

| Updated on: May 29, 2023 | 10:50 AM

राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांवरून राजकारण चांगलंच ढवळून निघत आहे. महाविकास आघाडीमध्ये असो की भाजप शिंदे गटाच्या महायुतीत असो जागा वाटपाचा विषय राज्याच्या राजकारणात चांगलाच गाजत आहे.

संभाजीराजे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात बंददाराआड चर्चा, जवळीक वाढणार?; चर्चांना उधाण
sambhaji chhatrapati
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव : स्वराज्य पक्षाचे नेते, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि भाजपचे नेते, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चा झाली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या दोन्ही नेत्यांची अचानक भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तसेच संभाजीराजे आणि भाजपच्या जवळकीची चर्चाही रंगली आहे.

संभाजीराजे छत्रपती हे एका कार्यक्रमासाठी जळगावात आले होते. येथील अजिंठा विश्रामगृहात या दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी गिरीश महाजन यांनी संभाजीराजेंचं स्वागत केलं. यावेळी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचीही उपस्थिती होती. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते संजय पवार यांचीही यावेळी उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. दोन्ही नेत्यांची खासगीत अर्धा ते पाऊण तास चर्चा झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. तर गिरीश महाजन यांनी मात्र ही राजकीय भेट नसल्याचा दावा केला आहे. राज्याभिषेक सोहळ्याच्या आयोजनाच्या विषयावर ही बैठक होती. संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत मित्रत्वाचे आणि कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्यासोबत राजकारणावर कुठलीही चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिलं.

हे सुद्धा वाचा

राजकारणावर चर्चा नाही

संभाजीराजे छत्रपती यांनी आगामी काळात त्यांच्या स्वराज्य पक्षाच्यावतीने स्वबळावर निवडणुका लढविण्याची घोषणा केली आहे. यावर मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, त्यांच्यासोबतच्या भेटीत राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही.

लोकसभेला लढणार नाही

गिरीश महाजन यांना भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सर्व खोट्या गोष्टी आहेत आहे. मीही टीव्हीवरच बघतोय. माझं नाव लोसभेचा उमेदवार म्हणून सूचवलं जातंय. असा कुठलाही विषय, चर्चा आणि निर्णय भाजपच्या बैठकीत झालेला नाही किंवा समोर आलेलं नाही. हे सर्व कल्पोकल्पित आहे. माझ्या खासदारकीच्या किंवा लोकसभेच्या उमेदवारीबाबत कुठलीही चर्चा आजपर्यंत झालेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.