सिनेमॅटिक लिबर्टिच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड, संभाजी छत्रपती यांचं थेट इतिहासकारांनाच आवाहन, म्हणाले…
देशपांडेंनीही सांगावं मी चुकलोय. शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांचा बाजार भरला हे त्यांना मान्य आहे का? बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची लढाई झाली हे त्यांना मान्य आहे का?
कोल्हापूर: सिनेमॅटिक लिबर्टिच्या नावाखाली इतिहासाची सर्रासपणे मोडतोड केली जात आहे. त्यामुळे माजी खासदार संभाजी छत्रपती संतापले आहेत. इतिहासाची मोडतोड रोखण्यासाठी आणि पुढील पिढीसमोर चुकीचा इतिहास दाखवला जाऊ नये म्हणून संभाजी छत्रपती यांनी थेट इतिहासकारांना आवाहन केलं आहे. इतिहासकार आणि इतिहास संशोधकांनी पुढे येऊन बोलावं. हीच वेळ आहे. सिनेमॅटिक लिबर्टीचा आधार घेऊन इतिहासाची मोडतोड करावी का? हे इतिहासकारांनी सांगावं, असं आवाहन संभाजी छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत केलं.
माझा विरोध दिग्दर्शक किंवा निर्मात्यावर नाही. कुणी सिनेमा काढला त्याला विरोध नाही. ऐतिहासिक मोडतोड करून सिनेमे करण्यावर माझा आक्षेप आहे. यात कोणताही राजकीय स्टंट नाही की राजकीय हेतू नाही. माझं म्हणणं आहे. हर हर महादेवमध्ये जे दाखवलं ते शतप्रतिशत बरोबर आहे का हे मला सर्व नेत्यांनी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पुरोगामी आणि प्रतिगाम्यांनीही सांगावं. खरं असेल तर मी या मिनिटाला हर हरला विरोध करणं सोडून देईन, असं संभाजी छत्रपती म्हणाले.
मीच का या सिनेमाला विरोध करू? ठरावीक पक्षांनीच का विरोध करावाय़ सर्व इतिहासकारांनी बोलावं ना आज.सिनेमॅटिक लिबर्टिच्या नावाखाली मोडतोड केलेला इतिहास दाखवायचा काय़ हे इतिहासाकारांनी आता बोलावं. इतिहास संशोधकांनी बोलावं, असं आवाहन त्यांनी केलं.
महाराजांवर प्रेम करता तर बोला. सांगा. हर हर महादेव बरोबर असेल तर सांगा. तुम्ही जर हे बरोबर आहे असं म्हणाला तर या पुढे मी एकदाही पत्रकार परिषद घेणार नाही. संभाजी छत्रपती तुम्ही चुकताय हे सांगा. मी वंशज आहे या अधिकाराने बोलतोय. तुम्हाला वाटतं वंशज खोटा बोलतोय तर सांगा तुम्ही. मी नाही बोलत या पुढे. संवैधानिक मार्गाने विरोध करणं हा आमचा अधिकार आहे, असंही ते म्हणाले.
देशपांडेंनीही सांगावं मी चुकलोय. शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांचा बाजार भरला हे त्यांना मान्य आहे का? शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांचा बाजार भरायचा हे कोणत्या इतिहासात लिहिलंय? बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची लढाई झाली हे त्यांना मान्य आहे का? असा सवाल त्यांनी केला