आदरणीय बाबा महाराज… आपल्या नात्याबाबत एकाच शब्दात सांगायचं तर Awe… संभाजीराजे यांनी वडिलांना लिहिलेलं भावनिक पत्रं होतंय व्हायरल
बाबा शेतीकडे वेगळ्याच नजरेने पाहत असतात. बाबांच्या मते शेतीमध्ये वेळेला फार महत्व असते. वेळेचे गणित ज्या शेतकऱ्याला समजते तोच खरा शेतकरी.
कोल्हापूर: माजी खासदार संभाजी छत्रपती यांचे वडील आणि करवीर अधिपती छत्रपती शाहू महाराज यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस आहे. त्यानिमत्ताने संभाजी छत्रपती यांनी आपल्या वडिलांसाठी फेसबुकवरून एक भावनिक पत्रं लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच वडिलांना भेटल्यानंतर त्यांना मिठी मारल्यावर मनातील घालमेलही व्यक्त केली आहे. शिवाय वडिलांसोबतचे प्रसंगही या पत्रातून मांडले आहेत. याशिवाय वडिलांचं आणि आपलं नातं कसं आहे तेही व्यक्त केलं आहे. आदरणीय बाबा महाराज… आपल्या नात्याबाबत एकाच शब्दात सांगायचं तर… आदरयुक्त भीती असंच म्हणता येईल, असंही संभाजी राजे यांनी पत्रात म्हटलं आहे.
संभाजीराजे यांनी वडिलांना लिहिलेलं भावनिक पत्र जसच्या तसं
आदरणीय बाबा – “महाराज”
श्री शाहू छत्रपती महाराजांचा आज अमृत महोत्सवी वाढदिवस… मला आदर्शवत आणि खऱ्या अर्थाने माझे मार्गदर्शक असलेल्या बाबांविषयी माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करत आहे. छत्रपती घराण्याची थोर परंपरा जपण्यासाठी अहोरात्र दक्ष असणारे महाराज, बाबा म्हणून ही तितकेच संवेदनशील आहेत.
लहानपणापासून त्यांनी आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. राजघराण्यात जन्माला आल्यामुळे जो मानसन्मान, किंवा विशेष वागणूक समाजात मिळते, त्यापासून त्यांनी कटाक्षाने लांब ठेवले. लोकांमध्ये मिसळल्याशिवाय त्यांची सुख-दुःखे समजणार नाहीत हा त्यांचा उद्देश असायचा.
आमच्यावर उत्तम संस्कार व्हावेत याची काळजी बाबांनी नेहमी घेतली. शालेय शिक्षणासाठी मला राजकुमार कॉलेज राजकोट येथे पाठविण्यात आले होते. याच शाळेमध्ये राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी शिक्षण घेतले होते.
कोल्हापूरला सुट्टीला आल्यानंतर, सुट्टी संपल्यावर बाबा मला सोडायला दरवेळी राजकोटला यायचे. शाळा जसजशी जवळ यायची तसतसे माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असत आणि महाराजांच्या चेहऱ्यावरची काळजी व त्यांच्या मनाची घालमेल स्पष्ट जाणवायची.
शाळेच्या गेटवर बाबा मला मिठी मारायचे, डोळ्यातून अश्रू यायचे. राज्यसभेवर खासदार म्हणून माझी निवड झाली आणि नवीन राजवाड्याच्या पोर्चमध्ये पहिल्यांदा बाबांची भेट झाली तेव्हा मारलेली मिठी, डोळ्यातून आलेले अश्रू यातील प्रेम, जिव्हाळा, काळजी तितकीच होती, जितकी राजकुमार कॉलेजच्या गेटवर मारलेल्या मिठीत होती.
बाबांनी नेहमीच व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर केला. माझ्या लग्नावेळी वधू निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. लग्न झाले त्यावेळेची आठवण सांगताना संयोगिताराजे सांगतात, “लग्न झाले तेव्हा मी खूपच लहान होते, पण बाबांनी मला खूप समजावून घेतले.
मी आपणास बाबा म्हणू का? असे विचारले असता, माझी दोन्ही मुलं मला बाबा म्हणतात, तुम्हीपण मला बाबाच म्हणा, असे बाबांनी सांगितले. किती प्रेम, किती आपुलकी, बाबांनी खूप लाड केले. बाबांनी मला नेहमीच मुलीसारखे वागवले.”
तारा कमांडो फोर्सच्या बियासकुंड ट्रेकला बाबांबरोबर संयोगिताराजे गेल्या असता, तिथला एक प्रसंग इथे सांगण्यासारखा आहे. रात्रीच्या वेळी कँपवर असताना, अचानकपणे वादळ व जोराचा पाऊस सुरू झाला. अनेकांच्या टेंटमध्ये पाणी येवू लागले. बाबांना काळजी वाटू लागली. संयोगिताराजेंना शोधत बाबा स्वतः पावसात कंदील घेऊन आले.
सर्व सुखरूप असल्याची खात्री करून पुन्हा आपल्या टेंटमध्ये गेले. कोणत्याही कामाचे सुक्ष्म नियोजन कसे करायचे, हे बाबांकडूनच शिकण्यासारखे आहे, असे संयोगिताराजे नेहमी म्हणत असतात.
चिरंजीव शहाजी लहान असताना बाबा व शहाजी अनेकवेळा कुशीरे ते जोतिबा ट्रेकला जात असत. घोडेस्वारी, व्यायाम, पोहणे यासाठी बाबा नेहमी शहाजींना प्रोत्साहन देत. शहाजी बाबांविषयी बोलताना म्हणतात, “आबांशी चर्चा करताना प्रत्येक विषयाचा पूर्ण अभ्यास करून जावे लागते. कोणत्याही गोष्टीचा खोलवर अभ्यास करून ते निर्णय घेत असतात.
आबांना वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांचा व्यासंग मोठा आहे, त्यामुळे आबांचा विवेक कायम जागृत असतो. आबांचा हा गुण मला सदैव प्रेरणा देणारा आहे.”
इतिहास हा बाबांचा आवडता विषय आहे, मेजर जनरल श्री शहाजी छत्रपती महाराजांप्रमाणेच त्यांनी इतिहास संशोधन मंडळास प्रोत्साहन देऊन मराठा इतिहास लेखन चळवळ पुढे चालू ठेवली. यातून अनेक ग्रंथांची निर्मिती झाली आहे.
राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी शैक्षणिक कार्यात केलेल्या कार्याचा वसा घेऊन सामान्य माणसाला गुणवत्तापूर्ण उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी बाबांनी छत्रपती शाहू विद्यालयाची स्थापना केली. इंग्रजी शाळेमध्ये मराठी भाषा सक्ती बाबांनी केली, कारण मातृभाषा अवगत असल्याशिवाय मातृभूमीशी नाळ जोडली जात नाही, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
साहसी वृत्ती समाजामध्ये रूजावी या उद्देशाने करवीर संस्थापिका महाराणी ताराबाई राणीसाहेब यांच्या नावाने तारा कमांडो फोर्स (T.C.F.) ची स्थापना केली आहे. बाबा क्रीडाप्रेमी आहेत. कुस्ती आणि फुटबॉल हे त्यांचे आवडते खेळ आहेत. आणि हेच संस्कार माझ्यात व शहाजींमध्ये आलेले आहेत.
नवीन राजवाड्याच्या लाल आखाड्यातील माती अंगाला लागली. कुस्ती बरोबरच फुटबॉल, क्रिकेट, घोडेस्वारी, स्विमिंग याची आवड बाबांमुळे निर्माण झाली. बाबा स्वत: शाळेवरील टाकीत मला पोहायला शिकवायचे. यातूनच माझ्यात खेळाडूवृत्ती आणि धाडसीपणा निर्माण झाला. बाबा, त्यांचे वडील मेजर जनरल श्री शहाजी छत्रपती महाराजांप्रमाणेच कडक शिस्तीचे आहेत. माझ्यात जी काही शिस्त आहे ती बाबांमुळेच आणि शांत स्वभाव आईंमुळे आहे.
बाबांच्या अनेक छंदापैकी एक छंद म्हणजे प्रवास व पर्यटन. प्रवास व पर्यटनामुळे माणासाच्या ज्ञानाची क्षितिजे विस्तारतात. जगाचा परिचय होतो. वेगवेगळ्या संस्कृतींची ओळख होते. माणूस परिपूर्ण प्रवासामुळे होतो, असा बाबांचा पक्का विश्वास आहे. बाबांच्या प्रेरणेमुळेच मी, संयोगिताराजे व शहाजी अनेक स्थळी पर्यटन करून त्या ठिकाणचे भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व जाणून घेत असतो.
बाबा शेतीकडे वेगळ्याच नजरेने पाहत असतात. बाबांच्या मते शेतीमध्ये वेळेला फार महत्व असते. वेळेचे गणित ज्या शेतकऱ्याला समजते तोच खरा शेतकरी. शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणे आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शेती व सर्व क्षेत्रात करावा यासाठी त्यांचा नेहमी आग्रह असतो.
बाबांच्या जीवनात स्वच्छतेला व पर्यावरणाला महत्वाचे स्थान आहे. संयोगिताराजे व शहाजी यांना पर्यावरणाची आवड बाबांमुळेच लागली. बाबांनी आम्हाला सर्व कामांमध्ये परिपूर्ण बनवण्याचा नेहमीच प्रयत्न केला.
त्यांच्यामुळेच कोणत्याही प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची वृत्ती माझ्यात निर्माण झाली. आमच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असते.
माझ्या मनात बाबांविषयी नेहमी आदराचेच स्थान आहे. बाबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो, मनःशांती आणि आनंद मिळो हीच प्रार्थना ! आम्ही आपल्या छत्रछायेखाली राहो आणि आपले मार्गदर्शन सतत राहो हीच सदिच्छा !
आम्हा तिघांच्या अंत:करणात बाबांचे स्थान असीम आहे. बाबा आणि माझे नाते एका शब्दात सांगायचे झाले तर… एकच शब्द येतो, तो म्हणजे ‘Awe’ (Respect with Reverential Fear) म्हणजे आदरयुक्त भिती !
– संभाजी छत्रपती