मनोज गाडेकर, प्रतिनिधी, शिर्डी : आर्यन खान प्रकरणानंतर चर्चेत आलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे युवकांना करिअर विषयक मार्गदर्शन केले. शिवप्रहार प्रतिष्ठाण या सामाजिक संघटनेच्या वतीने करिअर गाईडन्स सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना समीर वानखेडे यांनी दिलखुलास उत्तरे दिली. अन्टीला प्रकरणानंतर काही राजकीय लोक प्रसार माध्यमांमधून माझ्यावर तुटून पडले होते. तेव्हा नितीन चौगुले आणि सुरज आगे यांनी माझ्या ऑफिससमोर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर मला खूप प्रोत्साहन वाटले. आज त्यांच्या आग्रहाखातर श्रीरामपूरच्या युवकांना मार्गदर्शन करायला आलो असल्याचं वानखेडे यांनी म्हंटल.
समीर वानखेडे म्हणाले, मी माझ्या आयुष्यात साडेतीन हजार केसेस केल्यात. प्रसार माध्यमांमध्ये ज्यांना सेलिब्रिटी दाखवले जाते ते लोक माझ्यासाठी सेलिब्रिटी नाहीत. पेपरमध्ये नाव येण्यासाठी मी फक्त सेलिब्रिटी लोकांना पकडतो, अशी टीका केली जाते. माझ्या आयुष्यात बाबा आमटे, एपीजे अब्दुल कलाम, सिंधुताई सपकाळ हे लोक सेलिब्रिटी आहेत. दाऊदच्या भावावरती कारवाया केल्या. गँग संपवल्या हे कुणीच सांगत नाही. एक छोटीशी केस झाली आणि त्यानंतर टीका, चौकशी सुरू झाली. ठीक आहे. चिखलात हात टाकले तर शिंतोडे उडणारच आहेत, असंही वानखेडे यांनी म्हंटलं.
समीर वानखेडे यांनी म्हंटलं की, मी दररोज कायद्याला तोंड देतो. प्रत्येक दोन तासात माझ्यावर एक चौकशी लावली जाते. मी जॉब राष्ट्रभक्तीसाठी करतो, सॅलरीसाठी नाही. या अडचणी आणि चौकशा ज्यासाठी झाल्या ते काम पुन्हा पुन्हा करणार आहे. मी हे सगळं एन्जॉय करतो. आता फक्त दोन-तीन राजकारणी माझ्या समोर आलेत. मी आणखी लोकांची वाट बघतोय. ज्यादिवशी पेपरमध्ये माझ्याबद्दल वादग्रस्त लिखाण नसतं, एखादी समन्स आली नाही तर मला चुकचुकल्यासारख वाटतं असल्याचं त्यांनी सांगितलं.
समीर वानखेडे यांनी सांगितलं की, माझे वडील गरीब कुटुंबातले. मात्र माझी आई पृथ्वीराज चव्हाण यांची वंशज आहे. ती आर्थिकदृष्ट्या सधन आहे. जेव्हा मी अधिकारी झालो तेव्हा माझ्या नावावर आगोदरच सहा मालमत्ता होत्या. नोकरी जॉईन करताना मी माझी प्रॉपर्टी जाहीर केलेली आहे. जेव्हा मालमत्ता भाडोत्री दिल्या जातात, तेव्हा ते व्यवसायात मोडत नाही. जेव्हा तुम्ही स्वतः व्यवसाय करता तेव्हा तो गुन्हा ठरतो.
कितीही टीका झाली तरी मी त्याची चिंता करत नाही. जर टीका आणि आरोप झाले नाही तर तुम्ही अकार्यक्षम आहात. मी टीका एन्जॉय करतो आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराजांवरदेखील टीका झाली होती. आम्ही तर खूप छोटी माणसं आहोत. आरोप होत राहतात, असंही समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले.