सांगली : जिल्ह्यात उसाची लागवड केली जाते. काही शेतकऱ्यांचा ऊस हा रस्त्याला लागून आहे. त्यामुळे उसापासून रस विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. शेतातील ताजा ऊस तोडायचा. त्यापासून रस तयार करून विक्री करायचा, असा हा नगदी पैसे मिळवून देणारा व्यवसाय. संतोष शिंदे यांनी उसाची लागवड केली. शेतातच रसवंती लावली. दुपारची वेळ असल्याने ते घरी गेले होते. थोड्या वेळासाठी मुलाला रसवंतीगृहात बसवले होते. तेवढ्यात अनियंत्रित वेगवान कार आली आणि अनर्थ घडला.
या वेगवान कारने रसवंतीगृहाचे शेड तोडले. थेट आतमध्ये ही कार शिरली. शेडखाली ११ वर्षांचा मुलगा बसला होता. तो चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर गर्दी जमा झाली. संतोष शिंदे यांना कळले तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. नेहमी मदतीसाठी येणारं बाळ गेलं होतं.
पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे भरधाव वेगाने जाणारी मोटारकार जात होती. ती कार रसवंतीगृहात घुसल्याने शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. समर्थ संतोष शिंदे वय 11 असे मृताचे नाव आहे. हा अपघात रविवारी दुपारीच्या दरम्यान घडला. भिलवडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
तासगाव भिलवडी रस्त्यालगत खंडोबाचीवाडी येथे एका पेट्रोल पंपाच्या जवळ शेताकडेला संतोष गोपाळ शिंदे यांचे रसवंतीगृह आहे. रविवारी दुपारी या ठिकाणी त्यांचा मुलगा समर्थ बसला होता. यावेळी अचानक भिलवडी स्टेशनकडून भरधाव वेगाने जाणारी मोटार (क्र. एमएचसीएक्स 4081) रसवंतीगृहाच्या खंडोबाचीवाडी गावातील शेडमध्ये घुसली.
मोटारीचा वेग इतका भरधाव होता की, रस्त्याच्या डाव्या बाजूने चाललेली मोटार रस्त्याच्या उजव्या बाजूच्या रसवंतीगृहात घुसली. रसवंतीगृहाची पत्र्याची शेड उचकटून शेतात कोसळली. मोटारीच्या पुढील चाकाखाली चिरडल्याने समर्थ शिंदेचा जागीच मृत्यू झाला.
समर्थ हा शाळेत जाणारा मुलगा. दुपारी वडिलांना मदत करायला तो गेला होता. त्यावेळी अचानक दुर्घटना घडली. त्यामुळे समर्थचा शेवट झाला. चुणचुणित बाळ गेल्याने घरचे तसेच नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.