सीमावादाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका, गंभीर आरोप; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
आमच्या माहिती प्रमाणे आघाडीतील घटक पक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. सर्वांनी मेहनत घेतली होती. ही मुंबई आहे. मुंबईत शिवसेनेचा पगडा अधिक आहे.
सातारा: सीमावादाच्या प्रश्नावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्द्यावर न बोलण्याच्या अटीवरच एकनाथ शिंदे यांच्या हाती सोपवण्यात आल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे.
महाराष्ट्रातील स्वाभिमानावर बोलायचं नाही या अटीवर त्यांना सत्तेवर आणलं आहे. जनतेत उद्रेक झाला तरी तुम्ही बोलायचं नाही या अटीवर त्यांना सत्ता दिली. कालच्या मोर्च्याची ते रत्नागिरीच्या सभेशी तुलना करत असेल तर हे लोक आमच्या पक्षात होते हे दुर्देव आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत जातात. तिथे त्यांना एक इंजेक्शन दिलं जातं. त्यामुळे त्यांची गुंगी उतर नाही. हे सर्व गुंगाराम गुंगीत आहेत. गुंगी उतरल्याववर पुन्हा ते दिल्लीत जातात आणि इंजेक्शन घेतात, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
हा मोर्चा नॅनो होता की आणखी काही होता हे देशाने पाहिलं. हा ज्ञानदेवाचा महाराष्ट्र आहे. नॅनो बुद्धीचा नाही. फडणवीसांनी स्वत:ची अवहेलना करून घेऊ नका. तुमचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. तुमच्याकडे क्षमता आहे.
ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राची अवहेलना केली. ते महाराष्ट्राच्या राजकारणातून पाचोळ्यासारखे उडून गेले. कालच्या मोर्चाचं कौतुक आणि स्वागतच करायला हवं होतं, असं ते म्हणाले.
मोर्चाला नॅनो संबोधून तुम्ही एक प्रकारे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील जनतेला हे मान्य नाही. केंद्राने राज्यपालांना माघारी बोलावलं नसलं तरी जनतेने राज्यपालांना डिसमिस केलं आहे. आता सरकारलाही डिसमिस केलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
हा आघाडीचा मोर्चा होता. सपा, डावे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या मोर्चात होते. मुंबई-ठाण्यात शिवसेनेचा पगडा आहे. आमच्या शाखेचं जाळं आहे. तिथून माणसं आणणं सोपं असतं.
आमच्या माहिती प्रमाणे आघाडीतील घटक पक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. सर्वांनी मेहनत घेतली होती. ही मुंबई आहे. मुंबईत शिवसेनेचा पगडा अधिक आहे. त्यामुळे मोर्चात भगवे झेंडे जास्त दिसले, असंही त्यांनी सांगितलं.
हा द्वेष आणि जळजळ, मळमळ हे नॅनो बुद्धीचं लक्षण आहे. मोर्चाचं पहिलं टोक बोरीबंदर आणि दुसरं टोक राणीबागेत होतं. याला नॅनो मोर्चा म्हणत असाल तर तुम्ही राजकारणात काढलेली वर्ष वाया गेली असं म्हणावं लागेल. यापुढे अधिक प्रखरतेने मोर्चे निघतील. तुम्ही लोकमताला ठोकरू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.