शिव्या द्यायच्या तर द्या ना, राजभवनाबाहेर उभं राहून देता का? ; संजय राऊत यांचं शिंदे गटाला आव्हान
आमचं कर्नाटकातील जनतेशी भांडण नाही. हा मानवतेचा लढा आहे. 20 लाख मराठी बांधव 60 वर्षापासून लढत आहेत. पण कानडी सरकार त्यांच्यावर वारंवार अन्याय करत आहे, असंही ते म्हणाले.
शिर्डी: गद्दार आमच्या सारख्या निष्ठावंतांना शिव्या देत असतील तर हा आमच्या निष्ठेचा विजय आहे. यांना शिव्या देण्याची एवढीच हौस असेल तर राज्यात अनेक प्रकरण घडत आहेत. यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना त्यांनी किती लोकांना शिव्या दिल्या? असा सवाल करतानाच द्या ना शिव्या. शिवाजी महाराजांचा अपमान सुरू आहे. तुम्हाला संधी मिळाली आहे. शिव्या द्या. राजभवनाच्या बाहेर उभं राहून देता का शिव्या; असं आव्हानच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिलं आहे.
संजय राऊत शिर्डीत आले आहेत. तुरुंगातून सुटल्यानंतर ते पहिल्यांदाच सहकुटुंब शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली.
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला द्या शिव्या. हिंमत आहे? नाही. महाराष्ट्रावर कर्नाटकाचा हल्ला होतोय. बोम्मईंना शिव्या देताय? नाही. शिव्या कुणाला देताय शिवसैनिकांना. निष्ठावंतांना. जरूर शिव्या द्या. तुमच्या शिव्या ऐकण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे. त्यांच्या शिव्यांचा काही परिणाम होणार नाही. हे लोक वेडे झाले आहेत. वेडे लोक आहेत, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
शिवसेनेत असेही लोक आहेत. ज्यांनी गुडघे टेकवले नाही. आजही लढत आहेत. कितीही चौकश्या झाल्या तरी आम्ही लढणारे लोक आहोत. ही बाळासाहेब ठाकरेंची पार्टी आहे. हा वाघांचा पक्ष आहे. घाबरणार नाही. बंदुकीची गोळी आली तरी आम्ही घाबरणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा कुटुंब, मित्र परिवार पक्ष न्यायालयीन लढाई लढत असताना आपण देवाच्या चरणीही जातो. ही आपली परंपरा आहे. मी इथे येत असतो. मधल्या काळात आलो नाही. मला या भूमिचा आशीर्वाद मिळाला आहे, असं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील गावांनी कर्नाटकात जावं म्हणून कर्नाटक सरकारने योजनाबद्ध कार्यक्रम आखला आहे. सीमाभाग लढा आणि शिवाजी महाराजांच्या अपमानावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा वाद काढला आहे. या विषयावर महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी विधानही केलं नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
तसेच आमचं कर्नाटकातील जनतेशी भांडण नाही. हा मानवतेचा लढा आहे. 20 लाख मराठी बांधव 60 वर्षापासून लढत आहेत. पण कानडी सरकार त्यांच्यावर वारंवार अन्याय करत आहे, असंही ते म्हणाले.