Nanded Rain | पुराच्या पाण्यात अडकलेल्या 2 जणांना वाचवण्यात एसडीआरएफच्या टीमला यश!
जिल्हामध्ये अनेक ठिकाणचे नागरिक पाणी साचल्याने घर सोडून सुरक्षित स्थळी निघून गेले आहेत. या भागात पावसामुळे हाहा:कार माजला असतांना महापालिकेची यंत्रणा किंवा आपत्ती व्यवस्थापन इथे पोहचले नाही. पावसाळ्यापूर्वी पालिकेने नालेसफाई केल्याचा दावा केला होता.
नांदेड : नांदेड (Nanded) जिल्हात कालरात्रीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. नांदेड जिल्ह्यातील बामणी इथे नदीला (River) आलेल्या पुराच्या पाण्यात दोन मजूर अडकून पडले होते, एसडीआरएफच्या पथकासह गावकऱ्यांनी बचाव कार्य राबवत या दोन्ही मजुरांना वाचवलय. दोन्ही मजूर हे झारखंड (Jharkhand) राज्यातील असून पुलाच्या सुरू असलेल्या कामावर ते थांबले होते. रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने हे दोघे जण पुराच्या विळख्यात अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाने सकाळपासून मदतकार्य करत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढले.
नांदेड शहरातील सखल भागात कमरे इतके पाणी साचले
नांदेड शहरातील सखल भागात कमरे इतके पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे यादरम्यान आपत्ती व्यवस्थापनाची टिम गायब आहे. नांदेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. नांदेड शहरातील श्रावस्तीनगर, सादतनगर, तेहरा नगर, नोबेल कॉलनी या भागात कमरे इतक पाणी साचलं आहे. या भागात अनेक नागरिक अडकून पडले आहेत . घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून नुकसान झाले . अजूनही पाऊस सुरू असल्याने पाणी वाढतच आहे. इतकेच नाही तर अनेकांच्या घरामध्ये पाणी देखील शिरल्याचे कळते आहे.
विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय
जिल्हामध्ये अनेक ठिकाणचे नागरिक पाणी साचल्याने घर सोडून सुरक्षित स्थळी निघून गेले आहेत. या भागात पावसामुळे हाहा:कार माजला असतांना महापालिकेची यंत्रणा किंवा आपत्ती व्यवस्थापन इथे पोहचले नाही. पावसाळ्यापूर्वी पालिकेने नालेसफाई केल्याचा दावा केला होता. मात्र, चार तासाच्या पावसासोबत पालिकेचा दावा देखील वाहुन गेला. कारण श्रावस्तीनगर भागातील नाल्यातील पाणी या भागात साचले आहे. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे जिल्हामध्ये अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा देखील बंद असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.