Akola Girls Missing : अकोल्यात बाल विकास सुधारगृहातून 7 मुली पळाल्या, सुरक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह
घटनेचे गांभीर्य पाहता खदान पोलिसांनी यातील दोन मुलींचा बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथून शोध घेतला आहे. तर उर्वरित पाच मुलींच्या फोटोंवरून त्यांचा शोध घेत असल्याचे समजते. याविषयी पोलीस आणि जागृती महिला राज्यगृह अधिकाऱ्यांनी बोलण्यास टाळले आहे.
अकोला : अकोला शहरातल्या खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बाल विकास सुधार गृहा (Child Development Correctional Institution)तून 7 मुली (Girls) पळून गेल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. याआधी सुद्धा अशीच घटना घडल्याने या सुधार गृहाच्या सुरक्षा प्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अकोला शहरातील खडकी परिसरात महिला व बाल विकास विभागाचे शासकीय जागृती महिला राज्यगृह आहे. या ठिकाणी हरवलेल्या व ज्यांना पारिवारिक आधार नाही अशा मुलींच्या राहण्याची व्यवस्था शासकीय योजनेमार्फत करण्यात आली आहे. याच ठिकाणी राहणाऱ्या 7 अल्पवयीन मुलींनी शनिवारी सकाळी 6 च्या सुमारास पलायन केल्याचे समजते. (Seven girls run away from Child Development Correctional Institution in Akola)
दोन मुलींचा शोध घेण्यास यश
विशेष म्हणजे याआधी सुद्धा 17 ऑक्टोबर 2020 रोजी याच सुधार गृहातून 6 मुलींनी रात्रीच्या सुमारास साडीच्या सहाय्याने सिने स्टाईल पलायन केले होते. या प्रकरणामुळे सदर ठिकाणच्या सुरक्षा प्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून याआधी देखील घडलेल्या अशाच घटनेने येथील कर्मचाऱ्यांचे डोळे उघडले नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. या घडलेल्या प्रकाराबाबत शासकीय जागृती महिला राज्यगृह येथील अधीक्षक यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून खदान पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल केली आहे. घटनेचे गांभीर्य पाहता खदान पोलिसांनी यातील दोन मुलींचा बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथून शोध घेतला आहे. तर उर्वरित पाच मुलींच्या फोटोंवरून त्यांचा शोध घेत असल्याचे समजते. याविषयी पोलीस आणि जागृती महिला राज्यगृह अधिकाऱ्यांनी बोलण्यास टाळले आहे. (Seven girls run away from Child Development Correctional Institution in Akola)