गुवाहाटीमुळेच सेलिब्रिटी झालो, आता दरवर्षी पत्नीसह गुवाहाटीला जाणार; शहाजीबापू पाटील भावूक
कर्नाटकच्या जनतेने एवढे लक्षात ठेवावं, छत्रपतींनी निर्मित केलेल्या महाराष्ट्रातील मावळे अजूनही जिवंत आहेत. मावळ्यांची परंपरा अजूनही जिवंत आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
पंढरपूर : शिंदे गटाचे आमदार उद्या 26 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार आहेत. कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी हे आमदार गुवाहाटीला जाणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुन्हा गुवाहाटीला जावं लागत असल्याने शिंदे गटाचे अनेक आमदार भावूकही झाले आहेत. काय झाडी, काय डोंगर फेम आमदार शहाजी बापू पाटील हे सुद्धा या दौऱ्यामुळे भावूक झाले आहेत. उद्या तर आम्ही गुवाहाटीला जाऊच. पण यापुढे मी दरवर्षी कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जाणार आहे, असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.
आम्ही उद्या गुवाहाटीला जाणार आहोत. निश्चितपणाने पुन्हा गुवाहाटीच्या आठवणी ताज्या होणार आहेत. भाव भावनांचे विश्व कळत नकळत हलके होणार आहे. खास करून माझ्या संवादाने मला प्रसिद्धी मिळाली आणि जनतेने केलेले माझ्या माणदेशी भाषेचे कौतुक यामुळे कामाख्या देवीच्या दर्शनाला गेल्यावर माझ्या डोळ्यातून अश्रू येणार आहेत, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
गुवाहाटीमुळे मी सेलिब्रिटी झालो हे वास्तव आहे. मी आता पत्नीसह दरवर्षी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहे. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प गुवाहाटीला गेल्यावर करणार आहे, असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.
सीमावादावरही त्यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. यापूर्वी कर्नाटकच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या जनतेला खुश करण्यासाठी अशी विधाने केलेली आहेत. हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील 40 गावं तर काय, एक एकर जमीनही देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
कर्नाटकच्या जनतेने एवढे लक्षात ठेवावं, छत्रपतींनी निर्मित केलेल्या महाराष्ट्रातील मावळे अजूनही जिवंत आहेत. मावळ्यांची परंपरा अजूनही जिवंत आहे, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातून महाराष्ट्राची जास्तीत जास्त सेवा घडावी, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वच्या सर्व 50 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी हे सर्व आमदार जाणार आहेत. या माध्यमातून आमदारांशी संवाद साधण्यात येणार आहे. आमदार एकसंघ राहावेत आणि पुढील निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळवण्यासाठी एकदिलाने काम व्हावं म्हणूनही शिंदे गटाने हा दौरा काढल्याचं सांगितलं जात आहे.