राज्यपालांपासून महाराष्ट्राची सुटका झाली तर आनंदच होईल; शरद पवार यांचा टोला
केसी चंद्रशेखर राव यांनी तेलंगनात विरोधी पक्षांचा मेळावा घेतला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. चंद्रशेखर राव यांनी यापूर्वीही अनेक मेळावे घेतले. त्यांच्या यापूर्वीच्या मेळाव्याला मीही हजर होतो.
कोल्हापूर: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे. खुद्द राज्यपालांच्या कार्यालयातूनच तसं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांची कोणत्याही क्षणी उचलबांगडी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्या जागी नवे राज्यपाल म्हणून पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची वर्णी लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तशी जोरदार चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर तुम्हाला काय वाटतं? असं शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर, चर्चाच सुरू आहे. त्याबद्दल मला माहिती नाही. पण आताच्या राज्यपालांपासून महाराष्ट्राची सुटका झाली तर आम्हाला आनंदच होईल, असा टोला शरद पवार यांनी लगावला. पवारांच्या या विधानामुळे एकच खसखस पिकली.
आताच का सूचलं माहीत नाही
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीला पत्र लिहिलं आहे. चंद्रकांतदादांच्या या प्रयत्नांची पवारांनी खिल्ली उडवली. त्यांनी पत्र पाठवलं की नाही माहीत नाही. पण कोल्हापूरची निवडणूक, नांदेडची निवडणूक आणि पंढरपूरची निवडणूक… या सर्व काळात त्यांना का आठवलं नाही? त्यांना आताच का सूचलं हे माहीत नाही, असा चिमटा पवारांनी काढला.
चिंता करायची गरज नाही
राष्ट्रवादीला फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींना फोडून अन्य ठिकाणी नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गटात हा प्रकार अधिक दिसतो. निवडणुका जवळ येतात तेव्हा ही परिस्थिती असते. पण त्याची चिंता करायची गरज नाही, असं ते म्हणाले.
सामान्यांचा अधिकार डावलला जातोय
पंचायत राज, जिल्हा परिषद, नगरपरिषदांच्या निवडणुका थांबवल्या आहेत. त्याचा निकाल कधी तरी घेतला पाहिजे. लोकांचा संबंध असलेल्या संस्थेत लोकप्रतिनिधी नाहीत. त्यामुळे सामान्यांचे मूलभूत अधिकार डावलले जात आहेत, असंही ते म्हणाले.
चंद्रशेखर राव यांच्याशी संवाद सुरू
केसी चंद्रशेखर राव यांनी तेलंगनात विरोधी पक्षांचा मेळावा घेतला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. चंद्रशेखर राव यांनी यापूर्वीही अनेक मेळावे घेतले. त्यांच्या यापूर्वीच्या मेळाव्याला मीही हजर होतो. त्यांच्याशीही आमचा सुसंवाद सुरू आहे. देशातील सर्व घटकांनी एकत्र यावं हा त्यांचा प्रयत्न आहे, असं त्यांनी सांगितलं.
राहुल गांधींना सामान्यांचा पाठिंबा
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला सामान्य माणसांचा पाठिंबा होता. राहुल गांधींबद्दलचं वेगळं मत करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याला लोकांनी उत्तर दिलं आहे. लोकांनी त्यांच्या सभांना गर्दी केली होती, असं ते म्हणाले.