मोठी बातमी ! ठाकरे आणि शिंदे गट पहिल्यांदाच आंदोलनात एकत्र, भाजपचा सहभाग नाही; राज्याच्या राजकारणात काय घडतंय?
राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा ठराव विधानसभेत मांडण्याची गरज नाही, असं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी म्हटलं आहे.
कोल्हापूर: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात विस्तवही जात नाही. दोन्हीकडे नेते रोज एकमेकांवर तुटून पडताना दिसतात. त्यामुळे दोन्ही गटाचे नेते एकत्र एकाच मंचावर येण्याची शक्यता कमीच असल्याचं बोललं जात होतं. मध्यंतरी कोकणात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही गटाचे बडे नेते एकत्र येणार होते. त्यामुळे दोन्ही गटातील दुरावा काहीसा कमी होईल असं वाटत होतं. मात्र, ठाकरे गटाने या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला अन् दोन्ही गटाचे नेते एकाच मंचावर येण्याचा प्रसंग टळला. मात्र, आज दोन्ही गटाचे नेते पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. निमित्त आहे महाराष्ट्र एकीकरण समितीचं आंदोलन.
महाराष्ट्र एकीकरण समितीचं आज कोल्हापुरात धरणे आंदोलन पार पडणार आहे. या धरणे आंदोलनात महाविकास आघाडीसह शिंदे गट ही सहभागी होणार आहे. म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिंदे गटही या आंदोलनात सहभागी होऊन कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवणार आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात भाजप सहभागी होणार नाही. त्यामुळे पहिल्यांदाच दोन्ही गटाचे नेते एकत्र येत असून त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन केलं जाणार आहे. कर्नाटक प्रशासनाकडून निवेदन स्वीकारलं जात नसल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापुरात धाव घेतली आहे. कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी एक दिवस महाराष्ट्र बंद ठेवण्याची एकीकरण समितीने मागणी केली आहे.
दरम्यान, राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा ठराव विधानसभेत मांडण्याची गरज नाही, असं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा या आधी ठराव झाला होता. त्यामुळे नव्याने ठराव मांडण्याची गरज नाही, असं खाडे यांचं म्हणणं आहे.
आम्ही सगळे कर्नाटकातील मराठी भाषिकांबरोबर आहोत, त्यामुळे नव्याने ठराव मांडण्याची गरज नाही. कर्नाटकला महाराष्ट्रातील एकही गाव देणार नाही. सांगली जिल्ह्यातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, असं खाडे यांनी ठणकावून सांगितलं आहे.