प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती कालच तुटली, बच्चू कडू यांचा दावा; विधानाने खळबळ
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार का लांबला यावरही त्यांनी भाष्य केलं. सर्वांना चांगली रात्री झोप लागते. आणखी चांगली झोप लागली पाहिजे म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबवला जातो.
परभणी: वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या युतीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी खोचक टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती तुटली आहे. कालच प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय भाष्य केलं ते तुम्ही पाहिलं असेल. त्यांनी मोदींची स्तुती केली. केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. त्यामुळे दोघांची युती तुटल्याचं स्पष्ट आहे, असा दावा बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी कारवाई करतात ती योग्य असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ईडीकडून होत असलेल्या कारवाईला मोदींनी पाठिंबा दिला आहे. प्रकाशजी खरे बोलले आहे. त्यांची भाजपसोबत युती होऊ शकते, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.
राज्यपाल वादग्रस्तच
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राज्यपाल हा राज्य चालवत नाही. मुख्यमंत्रीच राज्य चालवतात. पण राज्यपालांच्या काही आवश्यकता असतात. राज्यपाल जाणार की थांबणार हा विषय महत्त्वाचा नाही. पण राज्यपाल वादग्रस्त राहिले आहेत, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्रीच हिरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड काम करत आहेत. रात्री दोन वाजता गेलो तरी मुख्यमंत्री भेटतात. मुख्यमंत्री हिराच आहे. हिरा कही भी चमकता है, असंही ते म्हणाले.
विस्तार का लांबला?
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार का लांबला यावरही त्यांनी भाष्य केलं. सर्वांना चांगली रात्री झोप लागते. आणखी चांगली झोप लागली पाहिजे म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबवला जातो. आता मंत्रिमंडळात 20 लोकांना संधी मिळेल. त्यामुळे बाकीचे नाराज होतील. त्यांना झोप लागणार नाही.
त्यामुळे त्यांनी चांगली झोप घ्यावी म्हणून विस्तार लांबवला जातोय, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मी नाराज नाही. माझ्या चेहऱ्यावरून कुठेच वाटत नाही मी नाराज आहे. मीच फटाके फोडतो, असंही त्यांनी सांगितलं.
अजितदादांना स्वप्न पडतात
सरकार पडण्याचे अजितदादांना स्वप्न पडत राहतात. ते सकाळचे स्वप्न नाही. ते रात्री 12च्या आतचे स्वप्न पाहतात. त्यामुळे त्यांना वाटतं सरकार पडेल, असा चिमटा त्यांनी काढला.