VIDEO | मास्क न लावल्याने बाचाबाची, वर्ध्यात उदय सामंतांसमोरच शिवसैनिक आपापसात भिडले
उदय सामंतांच्या स्वागताला एक व्यक्ती मास्क न लावता आली होती. त्याला थांबवून मास्क लावण्यास सांगितल्यावरून गोंधळ झाला. त्यानंतर दोन गटांमध्ये बाचाबाची आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप केला जात आहे.
वर्धा : मास्क न लावल्याच्या कारणावरुन शिवसैनिक आपापसात भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, शिवसेना नेते उदय सामंत यांच्यासमोर वर्ध्यात ही घटना घडल्याची माहिती आहे. एका गटाकडून संपर्क प्रमुखाला मारल्याचा, तर दुसऱ्या गटाकडून ‘शिवप्रसाद’ दिल्याचा दावा केला जात आहे. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. (Shivsena Volunteers ruckus at Wardha in front of Minister Uday Samant over not wearing mask)
वर्ध्याच्या स्थानिक विश्रामगृहात शुक्रवारी (9 जुलै) दुपारी हा गोंधळ झाला. घडलेल्या घटनेचा व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत काल वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मास्क न लावताच एक व्यक्ती उदय सामंत यांच्या स्वागताला जात असल्याच्या कारणातून वाद झाल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
हिंगणघाट येथील सीताराम भुते ही व्यक्ती मास्क न लावता आली होती. त्याला थांबवून मास्क लावण्यास सांगितल्यावरून गोंधळ झाला. त्यानंतर दोन गटांमध्ये बाचाबाची आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप केला जात आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी नारेबाजी केल्यावरुन विश्रामगृहात गोंधळ निर्माण झाला.
जिल्हाप्रमुखांचं म्हणणं काय?
दरम्यान, शिवसेना संपर्क प्रमुख अनंत गुढे यांच्याशी बाचाबाची होऊन कानशिलात मारल्याचा दावा सीताराम भुते यांनी केला आहे. मात्र सीताराम भुते मास्क लावून आले नसल्याने त्यांना हटकलं असता बाचाबाची झाली. भुते यांनी काही चुकीचे वक्तव्य केल्याने शिवप्रसाद दिल्याचं जिल्हा प्रमुखांचं म्हणणं आहे. संपर्क प्रमुखांशी काहीही झालं नाही. तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. हा संपर्क प्रमुखांना बदमान करण्याचा कट असल्याचं जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर यांचं म्हणणं आहे.
पाहा व्हिडीओ :
मास्क न लावल्यावरुन शिवसैनिक आपापसात भिडल्याचा दावा, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत उदय सामंत यांच्यासमोरच वर्ध्यातील प्रकार pic.twitter.com/6x4MsCbmCQ
— Anish Bendre (@BendreAnish) July 10, 2021
संबंधित बातम्या :
VIDEO | भेळीवरुन वाद, तपोवन एक्सप्रेसमध्ये प्रवासी आणि फेरीवाल्यांमध्ये हाणामारी
Nashik च्या टोलनाक्यावर महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडीओ व्हायरल