चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील (Sindevahi taluka) मरेगाव येथे पुन्हा धातूचा बलून (Metal Balloon) आढळला. काल सकाळी पवनपार येथे आढळलेल्या धातूच्या बलून सारखाच हा बलून आहे. काल दुपारी मोहफूल वेचताना काही ग्रामस्थांना हा बलून आढळला. जिल्हा प्रशासनाने हा बलूनदेखील आपल्या ताब्यात घेतला. आतापर्यंत कोसळलेल्या सॅटेलाईटचे ( Satellite) सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे रिंग तर पवनपार आणि मरेगाव येथे धातूचे बलून आढळले आहेत. सिंदेवाही तालुक्यात अशा प्रकारचे आणखी काही भाग मिळतात का याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत तीन ठिकाणी तीन बॉल मिळाले. हे सर्व चेंडूच्या आकाराचे आहेत. शिवाय रिंग लाडबोरी येथे सर्वात अगोदर मिळाली.
चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने इसरो व अन्य संस्थांना यासंदर्भात पत्र दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात आकाशातून पडलेल्या वस्तूंसंदर्भात गूढ कायम आहे. या रिंग सदृश्य वस्तू व गोळ्यांमुळे कुठलीही हानी झाली नसल्याबाबत पालकमंत्र्यांनी दिलासा व्यक्त केला. मात्र या वस्तू उल्कापिंड नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व वस्तू नक्की काय आहेत. याबाबत सक्षम यंत्रणांनी माहिती देण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार यांचे मत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील एक-दोन नव्हे तर तीन ठिकाणी आतापर्यंत आकाशातून पडलेल्या वस्तू सापडल्यात. या तिन्ही वस्तू जवळपास सारख्याचं आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनानं ISRO ला कळविलं आहे. सिंदेवाही शहराजवळ असलेल्या गुंजेवाही-कोटा येथे पुन्हा एक गोलाकार चेंडू आकाराचा सिलिंडर मिळाले. पवनपार, मरेगाव, गुंजेवाही येथील गोळे सारखेच असल्याची माहिती प्रशासनाने ISRO ला दिली.
न्यूझिलंडमधील महिया बेटावरून रॉकेट लॅब कंपनीनं इलेक्ट्रॉन लाँच केलं होतं. ते पृथ्वीच्या सर्वात खालच्या कक्षेत सोडलं होतं. ही रिंग त्या रॉकेटचाच भाग असल्याचं स्काय वॉच गृपचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी सांगितलंय.