Kankavli | पर्यटकांसाठी आनंदाची बातमी…कणकवलीतील सावडाव धबधबा प्रवाहित, पाहा खास फोटो!
मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या काहीच अंतरावर असणा-या निसर्गरम्य सावडाव धबधबा महाराष्ट शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या यादीत आल्यावर अनेक पर्यटकांनी धबधब्यावर गर्दी केलीयं. सावडाव धबधबा परिसरात दमदार पडणा-या पाऊसामुळे पहिल्याच पावसानंतर धबधबा प्रवाहित झाला आहे.
सिंधुदुर्ग : पर्यटकांच्या (Tourists) पहिल्या पसंतीस असलेल्या कणकवलीतील सावडाव धबधबा प्रवाहित झाला आहे. पर्यटनासाठी तळकोकणात येणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती म्हणजे सावडावचा हा धबधबा. कोरोनामुळे (Corona) गेली दोन वर्षे वर्षा पर्यटनावर निर्बंध आल्यामुळे या धबधब्याचा आनंद पर्यटकांना घेता आला नव्हता. मात्र यंदा कोणतेही निर्बंध नसल्यामुळे पर्यटकांची गर्दी ओसंडून जाईल असा अंदाज आहे. सावडावचा धबधबा (Sawdaw waterfall) सुरू झाला अशी बातमी लागताच स्थानिकांसह पर्यटकांनी हजेरी लावत धबधब्याचा आनंद घेण्यास सुरूवात केलीयं.
पर्यटकांनी धबधब्यावर मोठी गर्दी
मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या काहीच अंतरावर असणा-या निसर्गरम्य सावडाव धबधबा महाराष्ट शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या यादीत आल्यावर अनेक पर्यटकांनी धबधब्यावर गर्दी केलीयं. सावडाव धबधबा परिसरात दमदार पडणा-या पाऊसामुळे पहिल्याच पावसानंतर धबधबा प्रवाहित झाला आहे. वर्षा पर्यटनांसाठी सावडावकडे अनेकांची पहिल्याच विकेंडलाच पाऊले वळली असून सावडाव धबधबा प्रवाहित झाल्याने वर्षा पर्यटकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळत आहे. मान्सून पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल अशी चिन्ह असताना जून अखेर एकदाचा दमदार पाऊस सुरु झाल्यावर जिल्हातील अनेक धबधबे प्रवाहीत झाले आहेत.
पहिल्याच विकेंडला सावडाव परिसर पर्यटकांनी बहरुन गेला
जिल्हातील सुरक्षित धबधबा म्हणून वर्षा पर्यटनासाठी जिल्हयासह राज्यातून व इतर राज्यातील अनेक पर्यटक मोठया संख्येने वर्षा पर्यटनासाठी सावडावला येत असतात. कणकवली तालुक्यातील सावडाव हा धबधबा पावसाळ्यात ओसंडून वाहू लागल्याने पहिल्याच विकेंडला सावडाव परिसर पर्यटकांनी बहरुन जावू लागला आहे. डोंगर पठारावरुन पसरट कड्यावरुन खाली कोसळणारा गर्द हिरव्या झाडा झुडपांतला आनंदाचं उधाणच आलेला सावडाव धबधबा कोसळून लागला असल्याने धबधब्याखाली आंघोळीचा अनेक पर्यटक लुटताना दिसत आहे. सगळयात सुरक्षित असा हा धबधबा कोरोनाकाळ सोडला तर दरवर्षी पर्यटक उच्चांक गर्दी करतात.
पर्यटकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध
ग्रामपंचायतस्तरावरुन शासनाच्या निधीतून सावडाव परिसरात रंगरंगोटी, नळपाणी योजना, स्वच्छता अशा प्रकारची कामे करण्यात आली असून पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पर्यटकांना थोडयाफार प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून म्हणावा तसा विकास सावडाव धबधब्याचा झालेला दिसत नाही. यावर्षीही जून ते सप्टेंबर काळात सावडाव धबधब्यावर पर्यटकांची संख्या वाढणार असून रविवार व सुटटीच्या दिवसांसह अन्य दिवशीही पर्यटक वर्षा पर्यटनासाठी गर्दी करणार आहेत.