सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा ठोकले शड्डू, उतरणार निवडणुकीच्या आखाड्यात; पराभवाचे उट्टे काढणार
Sudhir Mungantiwar On Vidhansabha : लोकसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला. पण पराभवाचा धसका घ्यायला पण त्यांच्याकडे उसंत नाही. त्यांनी पुढच्या निवडणुकीची तयारी सुद्धा सुरु केली आहे. काय आहे मुनगंटीवार यांचा प्लॅन
लोकसभा निकालात महाराष्ट्राने महायुतीला हाबाडा दिला. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना मोठ फटका बसला. काही मतदारसंघात मराठा फॅक्टर चालला. तर ओबीसी मतदारसंघातील निकालांनी पण भाजपला आत्मपरिक्षण करण्याची संधी दिली आहे. ओबीसी हा आपल्या हक्काचा मतदार असल्याचे भाजपचे मत या निकालांनी साफ पुसून काढले. चंद्रपूर लोकसभेचा निकाल तर भाजपसाठी झणझणीत अंजन ठरले. सुधीर मुनगंटीवार यांना पराभावाचा सामना करावा लागला. पण त्यांना या पराभवाचा धसका घेण्याची सुद्धा उसंत नाही. त्यांनी पुढच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
लोकसभेत झाले काय?
चंद्रपूर लोकसभेचा निकाल भाजपला धक्कादायक होता. इथे कोणता फॅक्टर चालला याचा धांडोळा पक्ष घेईलच. पण हक्काच्या ओबीसी मतदाराने पाठ फिरवली हे नक्की. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सुधीरभाऊंना दे धक्का दिला. धानोरकर यांनी मुनगंटीवार यांचा 2 लाख 60 हजार 406 मतांनी पराभव केला. हा मोठा फरक आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर यांना मोठे मताधिक्य मिळाले. मुनगंटीवार या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.
मुनगंटीवार विधानसभेसाठी सज्ज
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची पुन्हा एकदा विधानसभेची निवणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. चंद्रपूर लोकसभेतील पराभवनंतर मुनगंटीवार यांची विधानसभेची तयारी सुरु केली आहे. बल्लारपूर विधानसभा ते लढवणार आहेत. बल्लारपूर विधानसभेतच काँग्रेसला 48,200 मताधिक्य मिळाले आहे. पण लोकसभा आणि विधानसभेतील गणित वेगळे असते. त्याचा फायदा घेण्याचे भाजपचे प्रयत्न आहे. लोकसभेचा अनुभव ताजा असल्याने आता विधानसभेत मोठ्या ताकदीने विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
विधानसभेत अशी दाखवली ताकद
सुधीर मुनगंटीवार यांनी 2019 मध्ये बल्लारपूर विधानसभा निवडणुक लढवली होती. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे डॉ. विश्वास आनंदराव झाडे हे उमेदवार होते. तर वंचित बहुजन आघाडीकडून राजू झोडे हे उभे होते. या निवडणुकीत मुनगंटीवार यांना 86,002 मते मिळाली होती. तर झाडे यांना 52,762 मते मिळाली होती. 33,240 मतांनी मुनगंटीवार निवडून आले होते. 42.90 टक्के इतका त्यांच्या मताचा टक्का होता. याच मतदारसंघातून आता काँग्रेसला 48,200 मते मिळाली आहेत.