Gadchiroli Naxal | गडचिरोलीत 2 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, 20 लाख रुपयांचे होते बक्षीस
दीपक ईष्टाम व शामबत्ती आलाम हे दोघे पती-पत्नी आहेत. ते दोघेही प्लाटून क्रमांक 21 मध्ये कार्यरत होते. दीपक ईष्टाम हा डीव्हीसी पदावर तर शामबत्ती आलाम ही प्लाटून सदस्य म्हणून कार्यरत होते. दीपकवर खुनाचे 3, चकमकीचे 8, जाळपोळ 2 असे गुन्हे दाखल आहेत. जुलै- 2001 मध्ये तो कसनसूर दलम सदस्य पदावर भरती झाला होता.
गडचिरोली : शासनाने नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना (Surrender Scheme for Naxals ) जाहीर केली. वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा खात्मा झाला. हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणले. त्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. 20 लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी दीपक उर्फ मुन्शी रामसु ईष्टाम याने आत्मसमर्पण केले. त्याचे वय 34 वर्ष असून तो गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली (Etapalli in Gadchiroli District) तालुक्यातील गडेरी (पोमके कोटमी) येथील रहिवासी आहे. आत्मसमर्पण केलेला शामबत्ती नेवरु आलाम (वय 25 वर्षे) हा दुसरा नक्षलवादी आहे. ती छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील हिदवाडा (ओरच्छा) येथील रहिवासी आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल (Superintendent of Police Ankit Goyal) यांच्यासमोर या दोन्ही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
गेल्या तीन वर्षात आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविले. 2019 ते 2022 सालामध्ये आतापर्यंत एकूण 45 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये 5 डीव्हीसी, 2 दलम कमांडर, 3 उपकमांडर, 34 सदस्य व 1 जनमिलीशिया यांचा समावेश आहे. या नक्षलींचे आत्मसमर्पण घडवून मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कारवाई गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक, सोमय मुंडे, अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाचे सपोनी बाबासाहेब दुधाळ यांनी पार पाडली. टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर 2 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पण करणाऱ्यांना सुविधा काय
आतापर्यंत एकूण 649 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या माध्यमातून एकूण 144 आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना भूखंड वाटप करण्यात आले. 117 आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना घरकूल वाटप करण्यात आले. 643 आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना आधारकार्ड वाटप करण्यात आले. 36 महिला आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच 23 आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना शेळी पालन व इतर अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.