तानाजी सावंत यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची हवी होती, एकनाथ शिंदे यांच्यात हिम्मत नव्हती, असं म्हणायचंय का? सुषमा अंधारे यांनी घेरलं
राज्यातील सत्ता परिवर्तनाबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेलं मोठं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलंय. सुषमा अंधारे यांनी यावरून परभणीच्या सभेत खोचक टीका केली.
संतोष जाधव, परभणी: राज्यातील सत्ता परिवर्तनावरून तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलेल्या वक्तव्यावरून सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सावंत यांना चांगलंच कात्रीत पकडलंय. मंत्री तानाजी सावंत हे त्यांना मिळालेल्या मंत्रीपदावर खुश नाहीत त्यांना कदाचित मुख्यमंत्री पदाची खुर्ची हवी आहे. त्यांना हे सांगायचं असेल की एकनाथ शिंदे यांच्यात सत्तापरिवर्तनाची धमाक, हिम्मत नव्हती. एकनाथ शिंदे यांनी सत्तांतरणसाठी काही केले नाही. जे काही केले ते मी 150 बैठका घेऊन केले.. हे त्यांना सांगायचं असेल, अशी टीका सुषमा अंधारे यांनी परभणी येथील महाप्रबोधन यात्रेच्या कार्यक्रमात केली. परभणीचे पालकमंत्री तानाजी सावंत सांगतात मी 150 बैठका फडणवीस सोबत घेतल्या. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारीं यांच्यापेक्षा मी मोठी सभा पंढरपूर येथे घेतली असे मंत्री सावंत म्हणत आहेत, याचीही सुषमा अंधारे यांनी भाषणावेळी आठवण करून दिली.
काय म्हणाले होते मंत्री सावंत?
आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी सत्ता परिवर्तनाबाबत धाराशिव येथील परंडा येथे कुस्तीच्या जाहीर कार्यक्रमात गौप्यस्फ़ोट केला होता. 2019 पासून 2 वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री तानाजीराव सावंत यांच्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी 100 ते 150 बैठका झाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून मी धाराशिव जिल्हा परिषदेत राज्यातील पहिले बंड केले आणि भाजप शिवसेनेची सत्ता आणली. फडणवीस यांच्यासोबत मी बैठका घेत होतो. मी जे बोलतो ते करुन दाखवितो.
2019 पासूनच महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तापरिवर्तन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व मंत्री सावंत यांच्यात बैठका होत होत्या. आम्ही हे सगळं सांगून करीत होतो झाकून ठेवत नव्हतो , उजळ माथ्याने करीत होतो. सत्ता बदलण्याचे काम सुरु होते. मी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रमधील आमदार यांची मनधरणी करीत होतो असे मंत्री सावंत यांनी म्हटले होते.
राखी सावंतशी तुलना
भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांची तुलना राखी सावंतशी केल्यातंर सुषमा अंधारेंनी त्यावरून जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्या म्हणाल्या, ‘ मोहित कंबोज याने राखी याची तुलना मी सोडून इतर कोणाशी केली असती तर ते योग्य वाटले असते. मी कधीही फोटो शूट केले नाही. राखी हिची तुलना अमृता फडणवीस सोबत होऊ शकते. दोघीची प्लास्टिक सर्जरी झाली. दोघी मॉडेल आहेत. शिवाय दोघी गायक आहेत.अमृता फडणवीस व राखी सावंत तुलना होऊ शकते.मोहित कंबोज याने राखी सावंत यांच्याशी तुलना केली त्यात मला कुरघोडी राजकारण करायचे नाही. मला डॅमेज करण्याचा हा भाग आहे, असा आरोप अंधारे यांनी केलाय.