पोलिसांच्या वेशात येऊन रविकांत तुपकर यांनी अंगावर पेट्रोल ओतलं; पत्नी आणि आईसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न
या सरकारला लाजा वाटत नाही. लाज नसलेलं हे सरकार आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं आहे. फक्त घोषणा देणारं सरकार आहे. हे सरकार कृती शून्य आहे.
बुलढाणा: कापूस आणि सोयाबीनला चांगला भाव मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेलं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर तुपकर भूमिगत झाले होते. आज आंदोलन सुरू होताच तुपकर अचानक प्रकटले. पोलिसांच्या वेशात आलेल्या तुपकर यांनी आंदोलनात येऊन अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनात सहभागी झालेल्या आई आणि पत्नीसमोरच तुपकर यांनी हे कृत्य केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळळा. परंतु, तुपकर यांच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड, संताप आणि तळतळाट निर्माण झाला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू होताच रविकांत तुपकर या आंदोलनात सहभागी झाले. ते पोलिसाच्या वेशात होते. यावेळी तुपकर यांनी राज्य सरकारचा जोरदार निषेध नोंदवत अंगावर पेट्रोल घेतलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आई आणि पत्नीसमोरच तुपकर यांनी अंगावर पेट्रोल घेतलं. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी लगेचच तुपकर यांना ताब्यात घेतलं.
शेतकऱ्यांना गोळ्या घाला
यावेळी तुपकर प्रचंड संतापले होते. त्यांच्या मनातून प्रचंड चीड निर्माण झाली होती. आम्हाला गोळ्या घाला. शेतकऱ्यांना गोळ्या घाला. आमच्या मागण्या मान्य करत नसेल तर आम्हाला मारून टाका. हे कसलं सरकार आहे. या सरकारला जनतेचं काही पडलेलं नाही. शेतकऱ्यांचं काहीही घेणंदेणं नाही. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जात आहे, असा आरोप तुपकर यांनी केला.
सरकारला लाजा वाटत नाही
तर, या सरकारला लाजा वाटत नाही. लाज नसलेलं हे सरकार आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं आहे. फक्त घोषणा देणारं सरकार आहे. हे सरकार कृती शून्य आहे, असा तळतळाट यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
शेतकरी वर्गात चीड
दरम्यान, तुपकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे बुलढाण्यातील वातावरण तापलं आहे. शेतकरी वर्गात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. या आंदोलनाची गंभीरपणे दखल घेत जिल्हा कृषी अधिक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते तुपकर यांच्याशी चर्चा करत आहेत.
आधीच दिला होता इशारा
दरम्यान, तुपकर यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला आत्मदहनाचा इशारा दिला होता. कापूस, सोयाबीनला चांगला भाव द्या, पीक विम्याची रक्कम द्या, अतिवृष्टीची रक्कम द्या आदी मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करत आहोत. या मागण्या मान्य नाही झाल्या तर 10 फेब्रुवारी रोजी आम्ही आंदोलन करणार आहोत, असा इशारा तुपकर यांनी दिला होता.
त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनात तुपकर यांची पत्नी आणि आई सुद्धा सहभागी झाली होती.