राज्यात तिसरा महत्त्वाचा पक्ष म्हणून राजकारणात येणार बीआरएस?, बीआरएसला मिळणार यांची साथ
एमआयएम, छत्रपती संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांच्याशी चंद्रशेखर राव यांची जवळीक आगामी काळात राज्यातील समीकरण बदलू शकणारी ठरू शकते.
राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आपल्या बीआरएस या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करायला सुरुवात केलीय. नांदेडला दोन सभा घेतल्यानंतर के चंद्रशेखर राव यांनी औरंगाबाद आणि नागपूर इथेही सभा घेतल्या. अद्याप राज्य स्तरावरचा मोठा म्हणावा असा नेता बीआरएसच्या गळाला लागला नाही. पण स्थानिक पातळीवरच्या ताकतवान नेत्यांनी बीआरएस मध्ये प्रवेश केलाय. त्यातच एमआयएम, छत्रपती संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांच्याशी चंद्रशेखर राव यांची जवळीक आगामी काळात राज्यातील समीकरण बदलू शकणारी ठरू शकते.
असद ओवेसी यांच्या एमआयएम या राजकीय पक्षाने नांदेडमधून दहा वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात प्रवेश केला होता. त्यावेळी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत एमआयएमने मिळवलेले यश पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. याच एमआयएम पाठोपाठ हैदराबादचा बीआरएस हा राजकीय पक्ष आता नांदेडमार्ग राज्यात येऊ पाहतोय.
बीआरएसची मोर्चेबांधणी सुरू
नांदेडमधून शंकर अण्णा धोंडगे, सुरेश गायकवाड, यशपाल भिंगे, जाकेर चाऊस आणि नागनाथ घिसेवाड आदी मंडळींनी बीआरएसमध्ये प्रवेश केलाय. त्याचबरोबर हर्षवर्धन जाधव विदर्भातील राजू तोडसाम यांच्यासह काही काही माजी आमदारांनी बीआरएसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे बीआरएस आता चांगलेच चर्चेत आलय. बीआरएस आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करत असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश दादा गायकवाड यांनी सांगितलंय.
अब की बार किसान सरकार
तेलंगणा राज्यातील लोक कल्याणकारी योजनांची प्रसिद्धी करत तशाच योजना महाराष्ट्रात राबवण्यासाठी केसीआरच्या हातात सत्ता द्या असे या पक्षाचे धोरण आहे. अब की बार किसान सरकार म्हणत केसीआर यांनी शेतकरी नेत्यांना प्रथम पसंती दिलीय. त्यातून नांदेडचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी बीआरएसमध्ये प्रवेश करत पक्षाचे जोरात काम सुरू केलंय. नुकताच शंकर अण्णा समर्थकांचा आमरसाची मेजवानी देत मेळावा घेतला. तेव्हा लोहा कंधारमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणादेखील त्यांनी केलीय.
महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरुवात
दलित, अल्पसंख्याक आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानत भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरुवात केलीय. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय पक्षांची भाऊगर्दी काही कमी नाही. तिथे नवख्या बीआरएसला पहिल्याच निवडणुकीत यश मिळेल, असं म्हणणं धाडसाचं होईल. पण बीआरएसच्या रूपाने मतदारांना एक नवीन पर्याय उपलब्ध झालाय. राजकारणात सर्वसामान्य लोकांना येण्यासाठी बीआरएस हा चांगला पर्याय असल्याचे मत पक्षाचे नेते यशपाल भिंगे यांनी व्यक्त केलय.