नांदेडमध्ये भीषण अपघात, भरधाव वेगाने येणाऱ्या कार एकमेकांवर आदळल्या !
दोन कार विरुद्ध दिशेने आपापल्या मार्गाने भरधाव वेगात चालल्या होत्या. स्विफ्ट चालक कामावर चालला होता, तर ईर्टिकामधील कुटुंब कौटुंबिक कार्यक्रमाला चालले होते. मात्र दोघेही आपापल्या ठिकाणी पोहचण्याआधीच भयंकर घटना घडली.
नांदेड / राजीव गिरी : नांदेड जिल्ह्यातील तामसा ते नांदेड रोडवर दोन कारच्या आमनेसामने झालेल्या धडकेत एकूण दहा जण जखमी झाले आहेत. यातील जखमींना तामसा इथल्या आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन नांदेडला हलवण्यात आलंय. दोन्ही कार भरधाव वेगात असताना हा अपघात झाल्याने दोन्ही गाड्यांचे जबर नुकसान देखील या अपघातात झालंय. या अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जण जखमी झाले असून, दुसऱ्या कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. नांदेडहुन हदगावकडे एका घरगुती कार्यक्रमाला कुटुंबीय आपल्या कारने चालले होते. मात्र कार्यक्रमाला पोहचण्याआधीच त्यांच्या कारला अपघात झाला.
जखमींवर प्राथमिक उपचार करुन नांदेडला हलवले
सचिन साहेबराव कारले, विशाल भिमा बिमलवाड, कांता दत्ता बिमलवाड, आशुतोष निलोडवाड, पदमीन राम बिम्मलवाड, आकांक्षा बिम्मलवाड, वर्षा बाळू बिम्मलवाड, दत्ता बिम्मलवाड, शांताबाई सोनुले, चंद्रकलाबाई निलोडवाड अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी तामसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तामसा प्राथमिक उपचार करुन जखमींना नांदेड येथे हलवण्यात आले.
इर्टिकामधील सर्व कौटुंबिक कार्यक्रमासाठी चालले होते
हदगाव तालुक्यातील कांडली खुर्द येथील सचिन साहेबराव कारले याचा मोटर रिवायडींगचा नांदेड येथे व्यवसाय आहे. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास समोरून येणारी ईर्टीका कार आणि सचिन कारले यांच्या कारची समोरासमोर धडक झाली. त्यात ईर्टीका कारमधील नऊ जण जखमी तर स्विफ्ट डिझायरमधील सचिन कारले असे एकूण दहा जण जखमी झाले. ईर्टीका वाहनामध्ये सात महिला, एक 15 वर्षाचा मुलगा आणि ड्रायव्हर असे मिळून नऊ जण होते. हे सर्व जण नांदेडहून हदगावला एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी चालले होते.